पुरुषोत्तम नवघरे, वणी: डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य कोणत्याही एका जाती-समाजापुरते मर्यादित नसून त्यांनी संपूर्ण समाजातील जातीय व सामाजिक विषमतेविरुद्ध लढा दिला. त्यांच्या विचारांना आजच्या काळात जात-धर्माच्या चौकटीत अडकविण्याचा प्रयत्न होत असून ही चिंताजनक बाब आहे. या महामानवांचे विचार आत्मसात करून त्यानुसार जीवन जगणे, हेच त्यांना खऱ्या अर्थाने अभिवादन ठरेल, असे प्रतिपादन वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश पी. एस. जोंधळे यांनी केले.
वणी वकील संघाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) येथील बार रूममध्ये आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते. यावेळी सह न्यायाधीश भोसले, बिरादर तसेच वकील संघाचे अध्यक्ष अॅड. वीरेंद्र महाजन, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. वसंतराव कवाडे आदी प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर अॅड. वीरेंद्र महाजन, अॅड. वसंतराव कवाडे, अॅड. रेखा तेलंग व अॅड. अमोल टोंगे यांनी मनोगत व्यक्त केले. अटर्नी हितेश मजगवडी यांनी सादर केलेल्या भीमगीताने कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी अॅड. वीरेंद्र महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित साहित्य वकील संघाच्या ग्रंथालयासाठी उपलब्ध करून देण्याची इच्छा व्यक्त केली. यामुळे वकिलांना कायद्याबरोबरच महामानवांच्या विचारांचा अभ्यास करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला वकील संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे सचिव अॅड. अमोल टोंगे यांनी केले.



Comments are closed.