शेतातील कोठ्याला आग, 1.64 लाखांचे नुकसान; दोन भावांवर गुन्हा

साहित्य जळून खाक; जुन्या वादातून आग लावल्याचा संशय

बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील चोपन येथील शेतशिवारात एका शेतकऱ्याच्या कोठ्याला जाणीवपूर्वक आग लावून सुमारे 1 लाख 64 हजार रुपयांचे नुकसान केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी दोन भावांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत फिर्यादी पंकज सुरेश खिरटकर (वय 33, रा. चोपन) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 17 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 6:30 वाजण्याच्या सुमारास ते घराच्या छतावर असताना त्यांच्या शेताकडून धूर निघताना दिसला. त्यांनी तात्काळ शेताकडे धाव घेतली असता, शेतातील कोठ्याला आग लागलेली दिसून आली.

या वेळी शेजारील दोघे शेतकरी घटनास्थळावरून पळून जाताना दिसल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. शेजारील शेताच्या रस्त्यावरून सुरू असलेल्या वादातूनच त्यांनी ही आग लावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दरम्यान, फिर्यादीने आपल्या कुटुंबीयांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. मात्र, कोठ्यातील शेती उपयोगी साहित्य, लाकूड, ताडपत्री, स्प्रे पंप, खते, तार व इतर साहित्य पूर्णतः जळून खाक झाले.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 326(फ) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार दिगंबर किनाके करत आहेत.

Comments are closed.