रामदेवबाबा विद्यालयातील विद्यार्थ्यांमुळे जिल्ह्याची मान उंचावली: मून

0

गिरीश कुबडे, वणी: श्री रामदेवबाबा मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्ह्याचा सन्मान वाढवला. यावर्षी जरी आपण तिसरे स्थान प्राप्त केले असले तरी संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर विजयी होईल असे गौरवोद्गार समाज कल्याण अधिकारी मंगला मून यांनी काढले. सोमवारी दिनांक 9 एप्रिलला रामदेवबाबा मुकबधीर विद्यालय चिखलगाव येथे राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत विजय प्राप्त करणा-या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.

24 ते 25 मार्चला गोंदिया जिल्हातील देवरी येथे दिव्यांगाची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा झाली. या स्पर्धेत रामदेवबाबा मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यवतमाळ जिल्ह्याला तिसरे स्थान प्राप्त करून दिले होते. विद्यालयातील ललिता मेश्राम, पूजा दासरवार प्रतिभा कोडापे, दिव्या मडावी, सुरक्षा घोटेकर. अजय गौरी, महेश्वरी आत्राम, निकेतन माने या विद्यार्थ्यांनी खेळाडुंनी रनिंग, गोळाफेक, लांबउडी, स्पॉट जंप या क्रीडाप्रकारात चमकदार कामगिरी करत 5 सुवर्ण, 2 रजत आणि 4 तांम्रपदक मिळवले होते. त्यानिमित्त सोमवारी समाजकल्याण अधिका-यांमार्फत या पाच विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला उद्घाटिका म्हणून जिल्हा समाज कल्याण अधिकारी मंगला मून लाभल्या होत्या. तर अध्यक्ष म्हणून दलितमित्र मेघराज भंडारी होते. प्रमुख अतिथी म्हणुन जि.प सदस्य संघदीप भगत, राजुरचे सरपंच प्रणिता मो. असलम, भांदेवाडाचे सरपंच दर्शना मानवटकर होते.

अध्यक्षीय भाषणात दलितमिञ मेघराज भंडारी यांनी सर्वांना समता पर्व सप्ताहाच्या शुभेच्छा दिल्या. ते पुढे म्हणाले की गेल्या तीन वर्षांपासून ललिता मेश्राम ही विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकत आहे. भविष्यात ती राष्ट्रीय स्पर्धेतदेखील चमकेल असा विश्वास वाटतो. असे गौरवोद्गार काढत त्यांनी सर्व विजयी खेळाडुंचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यपक जिनेंद्र भंडारी यांनी केले. यावेळी ते म्हणाले की मुकबधीर शाळेकरिता पहिली डिजिटल शाळा व कर्मशाळेतील विद्यार्थ्यांकरिता बरोजगार सहकारी संस्था उभारून रोजगार मिळवून देण्याचे काम हाती घेतले आहे. ते काम पुढील सत्रात करण्यात येईल.

कार्यक्रमाला उपस्थित असलेले जिल्हा परिषद सदस्य संघदीप भगत, प्रणिता असलम, दर्शना मानवटकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन सरोज जैन यांनी केले तर आभार प्रदर्शन लारोकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.