वणीत धक्कादायक घटना! दुचाकीतून 1 लाख रुपये चोरी
बँकेतून पैसे काढल्यानंतर लगेचच चोरट्यांनी साधला डाव
बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील भारतमाता चौक परिसरात दुचाकीच्या डिक्कीतील रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना घडली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजय भोजराज टोंगे (वय 25, रा. भालर क्वार्टर, वणी) यांनी 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 11:30 वाजता आपल्या वडिलांसोबत वणी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून एकूण 1 लाख 50 हजार रुपये काढले. त्यापैकी 1 लाख रुपये दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवून लॉक करून ते भारतमाता चौक परिसरातील धान्य खरेदीसाठी गेले होते.
काही वेळाने परत आल्यानंतर दुचाकीच्या डिक्कीचे लॉक तुटलेले दिसून आले. तपासणी केली असता डिक्कीतील 1 लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी तात्काळ वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
या घटनेवरून भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुदाम असोरे करीत आहेत.



Comments are closed.