बहुगुणी डेस्क, वणी : खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकरी मशागत व खत-बियाणे खरेदीच्या तयारीत व्यस्त आहेत. मात्र, याच काळात काही कृषी केंद्र चालकांकडून खत विक्रीत ‘लिंकिंग’चा प्रकार करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी उपविभागीय अधिकारी (SDO) यांना निवेदन देत संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांकडून मिळालेल्या तक्रारीनुसार, काही कृषी केंद्रांवर “आमच्याकडून बी-बियाणे घेतल्याशिवाय खत मिळणार नाही” अशी अट घालण्यात येत आहे. DAP, युरिया यांसारख्या मुख्य खतांसोबत बोगस टॉनिक, अनावश्यक कीटकनाशके किंवा दुय्यम दर्जाची खते घेण्यास भाग पाडले जात असल्याचेही निवेदनात नमूद आहे. काही ठिकाणी खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा दराने विक्री करण्याचे प्रकारही सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर वणी उपविभागातील सर्व कृषी केंद्रांची तातडीने तपासणी करण्यासाठी भरारी पथके नेमावीत, ‘लिंकिंग’ करणाऱ्या दुकानदारांचे परवाने तत्काळ रद्द करावेत व त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच प्रत्येक केंद्राबाहेर उपलब्ध साठा व शासकीय दर (MRP) दर्शविणारा फलक लावणे बंधनकारक करावे, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, येत्या ८ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास मनसेच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासह संबंधित कृषी केंद्रांवर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा फाल्गुन गोहोकार यांनी दिला आहे. या आंदोलनातून निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
निवेदन देताना शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष रमेश पेचे, गोविंद थेरे, विलन बोदाडकर, विठ्ठल हेपट, रवि आगसकांडे, लक्ष्मण उपरे, दिनेश डोंगे, मारोती पडवे, मंगेश झाडे, खुशाल पानघाटे, गौरव काकडे, कुणाल पायघन, राहुल बोधाने आदींसह शेतकरी उपस्थित होते.



Comments are closed.