विवेक तोटेवार, वणी: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आदिवासी समाजाचा “वनवासी” असा उल्लेख केल्याच्या निषेधार्थ अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती महिला शक्ती नारी संघटनेच्या वतीने मंगळवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. यावेळी भारताच्या राष्ट्रपतींना उद्देशून निवेदन सादर करून संबंधित वक्तव्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
संघटनेच्या अध्यक्ष भारती संतोष पेंदोर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात आदिवासी समाज हा भारताचा मूळनिवासी समाज असून त्यांची संस्कृती, परंपरा, इतिहास आणि सामाजिक ओळख समृद्ध व गौरवशाली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. स्वातंत्र्यलढ्यात तसेच जल, जंगल आणि जमिनीच्या संरक्षणासाठी आदिवासी समाजाने दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत “वनवासी” हा शब्दप्रयोग त्यांच्या स्वतंत्र अस्मितेला धक्का देणारा असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
यावेळी बोलताना भारती पेंदोर म्हणाल्या, “आम्ही वनवासी नाही, आम्ही आदिवासी आहोत. आम्ही या देशाचे मूळनिवासी आहोत. आमच्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि अस्तित्वाचा अपमान आम्ही सहन करणार नाही. आदिवासी समाजाच्या सन्मानासाठी आवश्यक असेल तो लोकशाही मार्गाने संघर्ष करण्यात येईल.”
राष्ट्रपतींकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात संबंधित वक्तव्याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात यावी तसेच भविष्यात अशा प्रकारची वक्तव्ये टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी विमल मडावी, सावंगी अध्यक्ष रंजना चांदेकर, नायगाव अध्यक्ष मनीषा येटी, सुमन येटी यांच्यासह संघटनेच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. आदिवासी समाजाच्या सन्मानासाठी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.



Comments are closed.