नवविवाहित दाम्पत्याची विहिरीत उडी; सगणापूर हादरले

अवघ्या महिनाभरात संसाराचा अंत; गाव बुडाले शोकसागरात

बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील सगणापूर येथे नवविवाहित दाम्पत्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आशिष धानोरकर आणि करिष्मा गेडाम यांचा विवाह 4 मे रोजी झाला होता. लग्नानंतर ते दोघेही कुटुंबीयांसोबत राहू लागले होते. मात्र अवघ्या एका महिन्याच्या संसारात असे काय घडले की या दाम्पत्याने जीवन संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतला, याबाबत परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सोमवारी 8 जून रोजी सायंकाळी सुमारे 8 वाजता हे नवविवाहित दाम्पत्य मोटारसायकलने घराबाहेर पडले होते. बराच वेळ होऊनही ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. नातेवाईक व गावकऱ्यांनी सर्वत्र चौकशी केली, मात्र दोघांचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. दरम्यान, नवरगाव शिवारातील एका शेतातील विहिरीजवळ आशिषची मोटारसायकल आढळून आली. त्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीत पाहणी केली असता दोघांनीही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.

घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, मारेगाव येथे पाठविण्यात आले. विशेष म्हणजे, या दाम्पत्याचा विवाह अवघ्या एका महिन्यापूर्वीच झाला होता. नव्या संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या या जोडप्याच्या अकाली मृत्यूने कुटुंबीय व ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे.

आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू असून तपास पूर्ण होईपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव पोलीस करीत आहेत. या घटनेनंतर धानोरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण सगणापूर गाव शोकसागरात बुडाले आहे.

Comments are closed.