अवैध दारू विक्रेत्यांविरोधात थोपटले दंड; दोन ठिकाणी छापे

वणी पोलिसांचा दणका, दोघांविरोधात गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: वणी शहरात अवैध दारू विक्रीविरोधात वणी पोलिसांनी धडक कारवाई करत दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये देशी दारूचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांवर पोलिसांचा वचक कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

पहिली कारवाई दि. 9 जून 2026 रोजी सकाळच्या सुमारास लालपुलिया-चिखलगाव परिसरात करण्यात आली. पोलिसांनी संशयावरून अभिनय सुनील गोलाईत (वय 25, रा. माळीपुरा, वणी) याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातील काळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीत 90 मिली क्षमतेचे देशी दारूने भरलेले 20 पव्वे आढळून आले. प्रत्येकी 40 रुपये किंमतीप्रमाणे एकूण 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधित दारू विक्रीसाठी बाळगल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दुसरी कारवाई दि. 10 जून 2026 रोजी सकाळी लालगुडा चौपाटी, भालर रोड परिसरात करण्यात आली. पोलीस स्टेशन वणीचे पोलीस हवालदार सतीष बारसागरे, पोलीस शिपाई ललित व शंकर हे पेट्रोलिंगवर असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी छापा टाकला. यावेळी नंदू उर्फ लक्की संभाजी मेश्राम (वय 34, रा. जुना लालगुडा, वणी) हा विनापरवाना देशी दारूची विक्री करताना आढळून आला.

आरोपीच्या ताब्यातील नायलॉन पिशवीतून रूपेश संत्रा कंपनीच्या देशी दारूने भरलेल्या 90 मिली क्षमतेच्या 17 प्लास्टिक शिश्या जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या दारूसाठ्याची किंमत 680 रुपये असून आरोपीकडे दारू विक्रीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे तपासात समोर आले.

दोन्ही प्रकरणांमध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत. अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधातील कारवाया यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Comments are closed.