विवेक तोटेवार, वणी: वणी शहरात अमली पदार्थांच्या काळ्या व्यवसायाचे जाळे पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन युवकांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडत मोठा सापळा उधळून लावला. एसपीएम शाळेच्या मागील मोकळ्या मैदानात एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जची विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला आणि अवघ्या काही क्षणांत दोघांच्या मुसक्या आवळल्या.
14 जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वणी शहरातील एसपीएम शाळेमागील परिसरात गोपनीय माहितीच्या आधारे पाळत ठेवली होती. संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेत झडती घेतली असता धक्कादायक बाब समोर आली. पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे सौरभ दिनेश खैरे (वय 25, रा. तेली फेल, वणी) आणि प्रथमेश विनोद गुंडेवार (वय 20, रा. भाग्यशाली नगर, वणी) अशी आहेत.
त्यांच्या ताब्यातून 5 ग्रॅम 11 मिलिग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज जप्त करण्यात आले. या अमली पदार्थाची किंमत सुमारे ₹59,370 असल्याचे पोलिसांनी सांगितले. कारवाईदरम्यान आरोपींकडून एक मोबाईल फोन आणि MH-29-CD-5776 क्रमांकाची दुचाकीही जप्त करण्यात आली. एकूण ₹1,63,790 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
शाळेजवळ ड्रग्ज विक्रीचा प्रयत्न?
विशेष म्हणजे, ही कारवाई शैक्षणिक परिसरालगत करण्यात आली आहे. त्यामुळे शहरात अमली पदार्थांचा पुरवठा वाढवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांच्या वेळेवर केलेल्या कारवाईमुळे मोठे ड्रग्ज रॅकेट उघड होण्याची शक्यता निर्माण झाली असून तपासाची दिशा आता पुरवठादार आणि इतर संशयितांकडे वळली आहे.

या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. ही धडक कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश चव्हाण, पोलिस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्ता पेंढकर, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, सलमान शेख आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.



Comments are closed.