मातीखाली गाडलेला इतिहास; तरुणांच्या हातांनी पुन्हा उजेडात

वणीच्या ध्येयासक्त तरुणाईचा ध्यास, कोंडलेल्या इतिहासाला मोकळा श्वास !

श्रीवल्लभ के.सरमोकदम (दि.१६ जून २०२६): सोमवार दि.८ ते १२ जून. हे पाच दिवस वणी शहर व परिसर अक्षरशः एखाद्या कुतूहलापोटी ढवळून निघाला होता. पहिल्या दिवशी दुपारी बाराच्या सुमारास अनेकांच्या मोबाईलवर स्थानिक युट्युबरचा एक व्हिडीओ दिसू लागला. त्यानंतर सलग पाच दिवस एका मागून एक व्हिडीओ झळकू लागले. वणीतील अंदाजे अर्धा शेकडा तरुण – तरुणी कुठल्याशा पायर्‍यांची सफाई करण्यात व्यस्त होती. कुणाच्या हातात कुदळ होती तर कुणाच्या फावडे. कुणी हातात झाडू घेतला होता तर कुणाच्या डोक्यावर कचरा व मातीने भरलेले टोपले. कुणी काटेरी अवजाराने दगडी पायर्‍यांवर जमलेला मातीचा थर कोरण्यात व्यस्त होता. सर्वांचे सर्वांग घामाने थिजले होते. पण कुणाचेही चेहरे त्रासिक नव्हते… की कपाळावर कुण्या कष्टाची आठी नव्हती…. होता तो… केवळ आणि केवळ अगम्य व निरपेक्ष उत्साह….

हाती घेतलेल्या यज्ञाची दृष्टीपथात दिसू लागलेली पूर्णत्वाची प्रचितीच ही तरुणाई अनुभवत होती.मात्र त्यानंतर या मोहिमेची संक्षिप्त माहिती पुढे येवू लागली. अन् दिवसाच्या अखेरीस वणीतील तरुणाईने एक मोठी मोहिमच फत्ते करण्याचा चंग बांधल्याचे स्पष्टच झाले. ही मोहिम होती, वणीतील शेकडो वर्षे जुन्या बारवच्या (पायर्‍यांची विहीर)जिर्णोद्धाराची! सलग पाच दिवस पुढे जाणार्‍या या कार्याचे व्हिडीओ नित्य नेमाने मोबाईलवर झळकत होते. पडलेला पडदा हळूहळू बाजूला होत होता. वर्षोगणती झाकोळलेली ही बारव या पाच दिवसीय यज्ञात दिवसागणिक उजळू लागली होती. या काळात तिची स्वच्छता तर झालीच पण वेली वृक्षांच्या मगरमिठीतूनही तिची सुटका झाली.

ही चिरेबंदी बारव जमिनीच्या पृष्ठभागापासून साधरणतः ५०ते ६०फुट खोल आहे. काही पायर्‍या उतरल्यानंतर चिरेबेंदी कमानीतून प्रवेशाने विसावा येतो. तेथून इंग्रजी एल आकाराचे वळण घेतलेल्या या वास्तूला एकूण ४५पायर्‍या आहेत. अंतिम पायरी नंतर विहिरीला असलेली देखणी कमान दृष्टीस पडते. या कमानींवर मध्यभागी गणेशमूर्ती अंकीत आहे. याशिवाय भव्य चिरेबंदींवर अनेक ठिकाणी शिल्पे आहेत. प्राचिन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली ही बारव गोंड साम्राज्यातील असल्याचा कयास आहे. शहराच्या पश्चिम बाजूस जलशुद्धीकरण केंद्रालगतचा हा संपूर्ण परिसर नगर परिषदेच्या अधिपत्याखाली आहे.

वणीपासून अवघ्या बारा कि.मि.अंतरावरचे शिरपूर हे ठिकाण गोंड अधिपत्याचे एक प्रमुख केंद्र होते. त्यांच्या साम्राज्याचा विस्तार सिरोंचा-अहेरी पासून माहूरगड- नांदेड ते थेट आंध्र-तेलंगनाच्या सिमेपर्यंत होता. शिवाय चंद्रपूर,भद्रावती,शिरपूरसह वणी शहरातही एकाच धाटणीची चिरेबंद बारव आजही सुस्थितीत आहे.त्यामूळेच वणीतील बारवही गोंड साम्राज्याची खूण असण्याला बळकटी मिळते. 

दुर्लक्ष आणि अडगळीत गेलेला इतिहास
वणी शहरातील ही वास्तू गेली कित्येक वर्षे अत्यंत अडगळीत पडली होती. अनेक वणीकरांना ही वास्तू असल्याचे ज्ञात होते खरे,पण तेथपर्यंत जाण्याचे कष्ट घेणार्‍यांची संख्या विरळाच होती. त्या भोवती कचरा,झाडे,झुडूपे आदींचा विळखा पडला होता. अगदी २०-२५ वर्षांपूर्वी पर्यंत त्यात पाणी होते. पण सभोवताल वस्ती होवू लागली तसतशी या वास्तूची दुरावस्था होवू लागली. विहिरीच्या चिरेबंदीला अगदी मूळ धरुन मोठ्या वृक्षांनी कवेत घेतले होते. बारवच्या मधोमध असलेल्या कमानीवर तर एका डेरेदार वृक्षाने आपले मजबूत बस्तान मांडले होते. या वास्तूची चिरेबंदी संरक्षण भिंत हळुहळू कधी नाहीशी झाली हे देखील कळले नाही.

त्याचे काही चिरे अनेंकांच्या घरातील कपडे धुण्याच्या कामी आले तर काहींनी घराच्या बांधकामात त्याला स्थान दिले. या मोडतोडी दरम्यान बरेच चिरे बारवच्या आत पडल्याने ते तेथेच स्थिरावले. लगतची मंगल कार्यालये,मंदीरे यांच्यासाठी ही बारव म्हणजे जणू हक्काची कचराकुंडी बनली. बारवरुपी विहिर व सभोवतालचा परिसर म्हणजे कुजलेले अन्न,जेवणाच्या पत्रावळीसह अन्य प्रकारच्या कचर्‍याचे आगार बनले. परिणामी ही विहीर १०ते१५ फुटांपर्यंत बुजल्याचा अंदाज आहे.त्यामूळे ज्यांनी या विहीरीला पाणी बघीतले आहे त्यांना मात्र आता साधा ओलावा बघणेही कठीण आहे.

ध्येयवेड्या तरुणांची इतिहासाप्रती बांधिलकी
वणीतील काही ध्येयवेड्या युवकांना मात्र विपन्नावस्थेतील ही वास्तू वारंवार खुणावत होती. अखेर त्यातून तिची आजतरी सुटका झाली आहे. तरुणांनी हे काम हाती घेतल्यानंतर अगदी पहिल्या दिवसापासून शहर व पंचक्रोशीत ही वार्ता वार्‍यासारखी पसरली. वणीतही अशी एखादी वास्तू आहे याची कल्पनाही नसलेल्यांची उत्सुकता अन् कुतूहल शिगेला पोहचले होते. दुसर्‍या दिवशी मात्र शेकडो वणीकरांचे पाय त्या दिशेला वळले. पाच दिवसांत शेकडो वणीकरांनी तेथे भेट देवून ही बारव व त्याचे सौंदर्य डोळ्यात,मोबाईलमधे जमेल त्या पद्धतीने टिपले. यात महिला देखिल आघाडीवर होत्या. एवढेच नव्हे तर आजी-माजी आमदारांनीही लवाजम्यासह या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली. युवकांशी संवाद साधला.पण ही वास्तू ,इतिहासाचा हा ठेवा जतन होण्याविषयी मात्र कुणीही ठोस आश्वासन देवू शकले नाही.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तरुणाई राबली, नगराध्यक्ष मात्र दूरच राहिल्या
शोकांतिकेची बाब म्हणजे वणी शहराची प्रथम नागरिक असलेल्या नगराध्यक्षांना मात्र या ठिकाणी येण्यास सवडच मिळाली नाही. पालिकेतील काही पदाधिकार्‍यांनी मात्र या ठिकाणी दोन तिन वेळा भेट देवून केवळ आपल्या उपस्थितीची जाणिव करुन दिली. वणी नगर परिषदेला नुकतीच शंभर वर्षे पूर्ण झाली असताना शहराचा ऐतिहासिक वारसा कमालिचा दुर्लक्षित आहे. ही बारव नगर परिषदेच्या जागेत असून त्याचे मात्र कुणालाही सोयरसुतक नसल्याचे स्पष्ट आहे. विकासाच्या नावाखाली ही बारव भविष्यात नामशेष होणार नाही याची खात्री आज तरी कुणीच देवू शकत नाही. कारण एकच; त्याविषयीची आस्था अन् गांभिर्याचा अभाव म्हणता येईल.

यवतमाळ जिल्ह्यातील वणी हे शहर आज तालुक्याचे ठिकाण असले तरी इंग्रज राजवटीत या शहराने तब्बल चार दशके जिल्ह्याचे वैभव अनुभवले आहे. दिडशे ते शंभरी पार केलेल्या अनेक इमारती आजही वणी शहरात आपले अस्तित्व टिकवून आहे. दिडशे वर्षांपूर्वीचा हा कालखंड असला तरी वणी शहराचे महत्व आणि त्याचे प्राचिनत्व दर्शवणारा हा काळ इतिहासात अभिमानाने नमूद आहे. अर्थात हा कागदोपत्रीचा पुरावा असला तरी वणी शहर हे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कलात्मक दृष्ट्या अगदी शेकडो वर्षांपासून संपन्न असल्याचे आश्वासक पुरावे आजही या शहराच्या मातीत मोकळा श्वास घेण्यासाठी आक्रंदन करित आहे. 

सफाई आधी आणि नंतर

गोंड संस्कृतीच्या पाऊलखुणा अजूनही जिवंत
वणी शहर व लगतचा परिसर म्हणजे गोंड राजवटीचा अत्यंत महत्वाचा भूप्रदेश. या परिसरात सुस्थितीत असलेल्या प्राचिन मंदीरांपासून अनेक भग्नावस्थेतील मंदीरे, गढ्या, पाण्याचे स्रोत आजही आपल्या अस्तित्वाची ग्वाही देत आहे. पण निव्वळ भोगवादाची कास धरलेल्या व्यवस्थेला याकडे लक्ष देण्यास वेळ नाही किंबहुना याविषयी यत्किंचीतही आस्था वा त्याचे गांभीर्य नाही. गोंड साम्राज्याचा अविभाज्य अंग असलेला वणी परिसर ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा भाग आहे. त्या काळातील ही शौर्यभूमि आहे.

पण त्याची कोणतीतीही तमा आज दिग्मुढ प्रशासन व समाधुरिणांमधे नसल्याचे प्रतित होते. ज्याचे महत्व अगदी कोवळ्या वयातील तरुणाईला कळले, ते जबाबदारी कळणार्‍यांना कधी कळणार हा कळीचा प्रश्न आहे.अर्थात वणीतील बारवच्या जिर्णोद्धाराची तरुणाईने केलेली मुहूर्तमेढ राजकीय व सामाजिक ठेकेदारांना दिलेली जोरदार चपराक आहे. किमान यातून ही मंडळी जागी होईल अशी सध्या तरी अपेक्षा करणे व्यर्थ न ठरो अशी आशा आहे. (श्रीवल्लभ के.सरमोकदम (7498169606))

 

Comments are closed.