पेपरफुटीविरोधात वणीच्या युवकांचा एल्गार, युवक-विद्यार्थी एकवटले

‘शिक्षण मंत्री राजीनामा द्या’; वणीत घोषणांनी परिसर दणाणला

बहुगुणी डेस्क, वणी: देशभरातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाचे पडसाद आता वणीतही उमटले आहेत. पेपरफुटी, वाढती बेरोजगारी आणि शिक्षण क्षेत्रातील खाजगीकरणाविरोधात शनिवारी (२० जून) शहरातील युवक, विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत शांतीपूर्ण आंदोलन केले.

सायंकाळी चार वाजता टिळक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ झालेल्या या आंदोलनात विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘शिक्षण मंत्री राजीनामा द्या’, ‘विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ थांबवा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
दिल्लीतील जंतरमंतरवर अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाशी एकात्मता दर्शवत वणीतील युवकांनी आपला रोष व्यक्त केला.

विविध स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये वारंवार होत असलेल्या पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. याशिवाय शिक्षण क्षेत्राचे वाढते खाजगीकरण आणि रोजगाराच्या संधींचा अभाव यावरही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या आंदोलनात संभाजी ब्रिगेड, एआयएसएफ (AISF), युवाशक्ती क्रांतिकारी संघटना तसेच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वाचनालयांमध्ये अभ्यास करणारे परीक्षार्थी, विद्यार्थी आणि पालकांनीही उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला.

विशेष म्हणजे, कोणताही गोंधळ किंवा अनुचित प्रकार न घडता संपूर्ण आंदोलन शांततेत पार पडले. युवकांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करणाऱ्या युवाशक्ती क्रांतिकारी संघटनेने केंद्र सरकारने या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा भविष्यात वणी तालुक्यात अधिक तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिला.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आता केवळ परीक्षांपुरता मर्यादित राहिलेला नाही. शिक्षण व्यवस्था, रोजगार आणि संधींची समानता या व्यापक मुद्द्यांवर युवक रस्त्यावर उतरू लागल्याचे चित्र या आंदोलनातून स्पष्ट झाले.

Comments are closed.