बहुगुणी डेस्क, वणी: सकाळी नेहमीप्रमाणे कॉम्प्युटर क्लाससाठी घराबाहेर पडलेली अल्पवयीन मुलगी संध्याकाळपर्यंत घरीच परतली नाही आणि कुटुंबीयांच्या काळजीचे रूपांतर काही तासांतच धावपळीत झाले. मैत्रिणी, नातेवाईक आणि ओळखीच्या ठिकाणी शोध घेतल्यानंतर अखेर मुलगी एका तरुणाच्या घरी असल्याचे समोर आले. या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, पीडिता (16 वर्ष) ही झरी तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. ती पांढरकवडा येथे शिकते. सध्या उन्हाळ्याची सुटी असल्याने तिने पांढरकवडा येथे कॉम्प्ट्युटर कोर्स लावला आहे. क्लाससाठी ती रोज बसने येजा करते. बुधवारी दिनांक 24 जून रोजी ती नेहमीप्रमाणे घरून क्लासला जाते सांगून निघाली. मात्र संध्याकाळी ती घरी परत आली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिच्या मैत्रिणींकडे चौकशी केली. त्यावेळी ती परतीच्या बसमध्ये सोबत नसल्याचे समोर आले.
मुलीच्या पालकांनी नातेवाईकांकडे चौकशी केली. मात्र तिथेही ती आढळली नाही. पीडितेच्या आईला एका 22 वर्षीय मुलावर संशय आला. मागील वर्षीही संबंधित तरुणाने मुलीला आपल्या घरी नेले होते. त्यावेळी दोन्ही कुटुंबीय आणि समाजातील मान्यवरांच्या बैठकीत मुलगी सज्ञान झाल्यानंतर लग्न लावून देण्याचे आश्वासन देत दोघांची समजूत काढण्यात आली होती.
मुलगी आढळली मुलाच्या घरी
मुलीच्या नातेवाईकांनी आरोपीच्या घरी जाऊन पाहणी केली असता मुलगी तेथे असल्याचे आढळून आले. त्यानंतर आईने मुलीशी मोबाईलवर संपर्क साधला असता तिने घरी येण्यास नकार दिला. मुलगी अल्पवयीन असल्याने मुलीच्या आईने पाटण पोलीस स्टेशन गाठले व फूस लावून पळवून नेल्याचा आरोप केला.
पोलिसांनी आरोपी मुलावर BNS कलम 137(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.


Comments are closed.