वणीत बंद फ्लॅट फोडला, दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

आता फ्लॅटही सुरक्षीत नाही. कुटुंब गावी, चोरट्यांनी साधली संधी

बहुगुणी डेस्क, वणी: सामान्यतः स्वतंत्र घरांपेक्षा फ्लॅट अधिक सुरक्षित मानले जातात. सीसीटीव्ही, चौकीदार आणि बंदिस्त परिसरामुळे चोरीचा धोका कमी असल्याचे अनेकांचे मत असते. मात्र वणी शहरातील महादेव नगरी परिसरातील घरफोडीच्या ताज्या घटनेने हा समज पुन्हा एकदा खोटा ठरवला आहे. कुटुंबीय बाहेरगावी असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी बंद फ्लॅटचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे ₹60 हजारांचा ऐवज लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

शहरातील महादेव नगरी परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद फ्लॅटचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत सुमारे ₹60 हजारांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. कुटुंबीय मूळ गावी उत्तर प्रदेशात गेल्यामुळे घरात एकटाच राहणाऱ्या दूध व्यावसायिकाच्या फ्लॅटवर चोरट्यांनी डल्ला मारल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी सूरज विजयभान यादव (वय 29) हा महादेव नगरी, चिखलगाव येथे राहून दूध व्यवसाय करतात. त्यांचा खरबडा येथे व्यवसाय आहे. सुमारे 2 महिन्यांपूर्वी त्यांचे आई-वडील आणि पत्नी उत्तर प्रदेशातील मूळ गावी गेले होते. त्यामुळे तो घरी एकटाच राहत होता. मंगळवारी दिनांक 23 जून रोजी रात्री 9 वाजता सूरज फ्लॅटला कुलूप लावून खडबडा मोहल्ल्यातील दूध व्यवसायाच्या ठिकाणी मुक्कामी गेला होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दुसऱ्या दिवशी सकाळी तो घरी परतला. मात्र  फ्लॅटच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश केल्यानंतर अलमारी उघडी असून घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळले. दुस-या दिवशी त्यांनी आईला फोनवर संपर्क साधून घरी काय दागदागिने व रोख रक्कम होती याबाबत विचारणा केली.

सूरजच्या आईने 10 ग्रॅम सोन्याचा हार (किंमत ₹40 हजार), दोन कानातील टॉप्स, नथ (अंदाजे 3 ग्रॅम, किंमत ₹15 हजार) तसेच ₹5 हजारांची रोख रक्कम, असा एकूण ₹60 हजारांचा मुद्देमाल घरी असल्याचे सांगितले. 24 जूनच्या पहाटे 1 ते 3 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

सूरजने पोलीस स्टेशन गाठून याबाबत तक्रारि दिली. अज्ञात आरोपीवर BNS कलम 305, 331(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Comments are closed.