सोलर प्लांटही चोरट्यांच्या निशाण्यावर; 3800 मी. केबल चोरीला

अज्ञात चोरट्यांनी केला इन्व्हर्टरला जोडलेला केबल लंपास

बहुगुणी डेस्क, वणी: वाढत्या चोरीच्या घटनांमुळे आता औद्योगिक प्रकल्पही चोरट्यांच्या निशाण्यावर आले आहेत. कडेकोट सुरक्षा व्यवस्था, रात्रपाळीतील सुरक्षा रक्षक आणि विस्तीर्ण परिसर असूनही चोरट्यांनी सोलर प्लांटमध्ये प्रवेश करून हजारो रुपयांचा डीसी केबल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादी राहुल लटारी उईके (वय 31) हे वणी तालुक्यातील वडजापूर येथील रहिवासी असून ते आरमाप्रो कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते वडजापूर येथील आवादा कंपनीच्या सोलर प्लांटमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून रात्रपाळीची ड्युटी बजावत आहेत.

26 जून रोजी रात्री 10 वाजल्यापासून ते सहकारी सुरक्षा रक्षक प्रज्योत डाहुले यांच्यासह सुमारे 12 एकर परिसरात पायदळ गस्त घालत होते. दुसऱ्या दिवशी 27 जून रोजी सकाळी 8 वाजता ड्युटी संपवून ते घरी गेले. त्यानंतर सोलर प्लांटचे काम पाहणारे ठेकेदार जावेद यांनी फोन करून सोलर इन्व्हर्टरला जोडलेला डीसी केबल तुटलेला असून चोरी झाल्याची माहिती दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यानंतर राहुल उईके यांनी तातडीने सोलर प्लांटवर जाऊन पाहणी केली असता, सोलर इन्व्हर्टरला जोडलेला सुमारे 3,800 मीटर लांबीचा डीसी केबल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. चोरी गेलेल्या केबलची अंदाजे किंमत ₹65 हजार असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेनंतर प्लांट परिसरात तसेच आजूबाजूच्या भागात केबलचा शोध घेण्यात आला. मात्र तो मिळून न आल्याने सुरक्षा कंपनीचे व्यवस्थापक गजानन आडे यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

या प्रकरणी 26 जून रोजी रात्री 10 ते 27 जून रोजी सकाळी 8 वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने सोलर इन्व्हर्टरला जोडलेला डीसी केबल चोरून नेल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.

Comments are closed.