बहुगुणी डेस्क, वणी: ग्रामीण, आदिवासी आणि शैक्षणिक क्षेत्रात चार दशकांहून अधिक काळ समर्पित सेवा देत हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारे, राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित विस्तार अधिकारी (शिक्षण) रमेश प्रभाकर बोबडे यांचा सेवापूर्ती (निवृत्ती) सत्कार सोहळा वणी पंचायत समितीत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करत सहकारी अधिकारी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. पंचायत समिती, वणी यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला उपविस्तार अधिकारी नीलेश हेडावू, विस्तार अधिकारी (शिक्षण) गणेश भोयर, वरिष्ठ लिपिक संतोष कुंटलवार, केंद्रप्रमुख भगत, शेषराव राजुरकर, संदीप मोवाडे, ईश्वर राऊत, रविकांत काळे, देविदास चिडे, सूरज चौधरी, संदीप ठाकरे यांच्यासह पंचायत समितीतील अधिकारी, कर्मचारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात रमेश प्रभाकर बोबडे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या प्रदीर्घ, प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ सेवेला गौरवोद्गार अर्पण करत शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचे कौतुक केले.
राष्ट्रपती पुरस्काराने झाला गौरव
रमेश बोबडे यांनी झरी-जामनी, मारेगाव आणि वणी परिसरातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम केले. सन 2015 मध्ये त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान त्यांच्या समर्पित सेवेला मिळालेली सर्वोच्च पावती मानला जातो. स्काउट-गाईड चळवळीत त्यांनी मोलाचे योगदान देत ‘स्काउट लीडर ट्रेनर’ हा मानाचा किताब मिळवला. तसेच वेस्ट व्हर्जिनिया (अमेरिका) येथे झालेल्या स्काउट-गाईड जंबोरीमध्ये प्रशिक्षक (Trainer) म्हणून काम करत भारतीय प्रतिनिधित्वाला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख मिळवून दिली.

विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी प्रौढ शिक्षण, स्वच्छता अभियान, हागणदारीमुक्त गाव उपक्रम तसेच आदिवासी भागातील शैक्षणिक उन्नतीसाठी अनेक उपक्रम राबवले. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संस्कार आणि समाजाभिमुखतेची भावना रुजविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी आणि शिक्षक घडले असून विविध क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
यावेळी मनोगत व्यक्त करताना उपविस्तार अधिकारी नीलेश हेडावू यांनी बोबडे यांच्या कार्याचा गौरव करत राष्ट्रपती पुरस्कार, क्रीडा क्षेत्रातील योगदान आणि अमेरिकेत प्रशिक्षक म्हणून केलेल्या कार्याचा विशेष उल्लेख केला. त्यांच्या कार्याचा आदर्श शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकाने घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांनी रमेश प्रभाकर बोबडे यांना सेवापूर्तीनिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या पुढील आयुष्यास उत्तम आरोग्य, आनंद, समृद्धी आणि दीर्घायुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सेवाकाळाला समाजसेवेचा प्रेरणादायी प्रवास म्हणून उपस्थितांनी गौरविले.


Comments are closed.