बहुगुणी डेस्क, वणी: वणी विधानसभा मतदारसंघातील विशेष मतदार यादी पुनरिक्षण (SIR) अभियानादरम्यान परराज्यातील नागरिकांच्या मतदार नोंदणीबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गंभीर आक्षेप नोंदवला आहे. मनसेचे पक्ष नेते राजू उंबरकर यांनी उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी यांना निवेदन देत, प्रत्येक अर्जाची सखोल व कायदेशीर पडताळणी करूनच मतदार यादीत समावेश करण्याची मागणी केली आहे.
मनसेच्या निवेदनानुसार, वणी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग आणि खनिज प्रकल्प असल्यामुळे विविध राज्यांतील कामगार वास्तव्यास आहेत. अशा परिस्थितीत काही परराज्यातील नागरिकांची नावे त्यांच्या मूळ राज्यातील मतदार यादीत कायम असतानाच वणी विधानसभा मतदारसंघातही नोंदणीसाठी अर्ज करण्यात येत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे मतदार यादीची शुद्धता, पारदर्शकता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक अर्जाची काटेकोर छाननी करणे आवश्यक असल्याचे मनसेने म्हटले आहे.
राजू उंबरकर यांनी निवेदनात नमूद केले आहे की, वणी विधानसभा मतदारसंघात दुबार मतदार आणि परप्रांतीय मतदारांच्या नोंदणीचा मुद्दा यापूर्वीही राज्य निवडणूक कार्यालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आला होता. त्यानंतरच निवडणूक आयोगाने विशेष मतदार यादी पुनरिक्षण (SIR) अभियान सुरू केले आहे. त्यामुळे या अभियानादरम्यान परराज्यातील नागरिकांच्या प्रत्येक अर्जाची कठोर पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
संबंधित व्यक्तीचे नाव त्यांच्या मूळ राज्यातील मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे का किंवा ते नाव प्रत्यक्ष वगळण्यात आले आहे का, याची संबंधित राज्यातील सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांकडून अधिकृत खातरजमा करण्यात यावी. त्यानंतरच संबंधित व्यक्तीचे नाव वणी विधानसभा मतदार यादीत समाविष्ट करावे, अशी भूमिका मनसेने मांडली आहे.
याशिवाय, यापूर्वीच मतदार यादीत समाविष्ट असलेल्या परराज्यातील नागरिकांच्या नावांचीही त्यांच्या मूळ राज्यातील मतदार यादीशी पडताळणी करण्यात यावी. दोन राज्यांच्या मतदार यादीत एकाच व्यक्तीचे नाव आढळल्यास नियमानुसार तातडीने कारवाई करावी. तसेच जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन किंवा दोन राज्यांमध्ये मतदार म्हणून नोंद कायम ठेवल्याचे आढळल्यास संबंधितांवर लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 तसेच इतर लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
मतदार यादीची पवित्रता, निष्पक्षता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रभावी पावले उचलावीत, असे आवाहन राजू उंबरकर यांनी केले आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्य निवडणूक आयुक्त (मुंबई), विभागीय आयुक्त (अमरावती) आणि जिल्हाधिकारी, यवतमाळ यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या निवेदनामुळे वणी विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी प्रक्रिया आणि संभाव्य दुबार मतदारांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, आगामी काळात या विषयावर राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यावेळी शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष रमेश पेचे, तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहकार, व्यापारी सेना शहराध्यक्ष राकेश वैद्य, गोविंद थेरे, अनिल टोंगे, परसराम खंडाळकर, मयूर घाटोळे, मयूर गेडाम, आशिष ठावरी, मनोज उरकुडे, लक्ष्मण उपरे, भोला चिकनकर, गुड्डू धोटे, हितेश पचारे, प्रतीक बुरडकर, वैभव पुराणकर, सुरज काकडे, धीरज बगवा आदी उपस्थित होते.


Comments are closed.