वणीतील ‘रुद्राक्ष वन’ प्रकल्पाला निधीची गरज; बेलुरकरांची मागणी

11 कोटी 97 लाख निधीची मागणी; पुढील टप्पा निधीअभावी ठप्प

विवेक तोटेवार, वणी: वणी शहराच्या पर्यावरणीय आणि पर्यटन विकासाला नवी दिशा देऊ शकणारा महत्त्वाकांक्षी ‘रुद्राक्ष वनप्रकल्प’ निधीअभावी रखडला आहे. प्रकल्पाचे उर्वरित काम तातडीने सुरू करून तो निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला 11 कोटी 97 लाख रुपयांचा उर्वरित निधी मंजूर करावा, अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा वणी नगर परिषदेचे सदस्य रवि बेलुरकर यांनी केली आहे. दरम्यान, बेलुरकर यांच्या मागणीची दखल घेत माजी वनमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे पत्राद्वारे पाठपुरावा केला आहे.

वणी शहरापासून सुमारे 6 ते 7 किलोमीटर अंतरावर निंबाळा (रोड) परिसरातील वनविभागाच्या कक्ष क्रमांक 53 मध्ये हा प्रकल्प साकारण्यात येत आहे. महसूल व वनविभागाच्या मान्यतेनंतर प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली. प्रकल्पाचे एकूण अंदाजपत्रक 14 कोटी 97 लाख रुपये असून, सुरुवातीच्या टप्प्यात शासनाकडून 3 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता.

या निधीतून प्रकल्पाची संरक्षण भिंत, स्वच्छतागृह, कार्यालय तसेच नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक यांसारखी प्राथमिक कामे करण्यात आली. मात्र, पुढील टप्प्यातील कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध न झाल्याने प्रकल्पाचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे उर्वरित 11 कोटी 97 लाख रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

रुद्राक्षासह औषधी वनस्पतींची लागवड
‘रुद्राक्ष वन’ हा केवळ वृक्षलागवडीपुरता मर्यादित प्रकल्प नसून, वणीकरांसाठी पर्यावरणपूरक आणि निसर्गरम्य सार्वजनिक स्थळ म्हणून तो विकसित करण्याचे नियोजन आहे. प्रकल्प परिसरात रुद्राक्षाच्या झाडांसोबत विविध औषधी वनस्पती, फुलझाडे आणि बहुउपयोगी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना फिरण्यासाठी तसेच निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी आकर्षक परिसर उपलब्ध होणार आहे. यामुळे वणीच्या हरित क्षेत्रात वाढ होण्यासोबतच शहराच्या पर्यावरणीय सौंदर्यातही भर पडण्याची अपेक्षा आहे.

‘रुद्राक्ष वन’ पर्यावरणीय भविष्यासाठीची गुंतवणूक : रवि बेलुरकर
रुद्राक्ष वन’ हा केवळ एक प्रकल्प नाही, तर वणीच्या पर्यावरणीय भविष्यासाठीची गुंतवणूक आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास वणीकरांना निसर्गाच्या सान्निध्यात एक सुंदर आणि दर्जेदार सार्वजनिक परिसर उपलब्ध होईल. त्यामुळे निधीअभावी प्रकल्प रखडवून न ठेवता शासनाने उर्वरित 11 कोटी 97 लाख रुपयांचा निधी तातडीने मंजूर करावा आणि रखडलेली कामे वेगाने पूर्ण करावीत. : रवि बेलुरकर, जिल्हा उपाध्यक्ष भाजप

प्रकल्प निधीअभावी रखडल्याची बाब लक्षात घेऊन रवि बेलुरकर यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले होते. या मागणीची दखल घेत मुनगंटीवार यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र पाठवून प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी आवश्यक निधी मंजूर करण्याबाबत कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आता वनविभागाकडून निधी मंजुरीबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे वणीकरांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.