माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा वणीत सत्कार

माळी समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सत्कार सोहळा

बहुगुणी डेस्क, वणी: माळी समाज बहुउद्देशीय संस्था, वणीच्या वतीने सावता माळी पुण्यतिथीनिमित्त सत्र 2025-26 मध्ये दहावी व बारावीच्या परीक्षेत 75 टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा 15 ऑगस्ट रोजी शेतकरी मंदिर, वणी येथे उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय देरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची उपस्थिती होती. यासह सामाजिक कार्यकर्ते समीर लेनगुळे, संस्थेचे अध्यक्ष भवानी मांदाडे, उपाध्यक्ष महेश चौधरी, सचिव भास्करराव वाढई, राजू मांदाडे, अमोल गुरनुले, अक्षय निकोडे आणि सामाजिक कार्यकर्त्या माया लोहबडे यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यावेळी मार्गदर्शन करताना आमदार संजय देरकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच माळी समाजासाठी वणी शहरात भव्य समाज भवन उभारण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याची ग्वाही त्यांनी दिली.

माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनीही गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. समाज भवनासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात नगर परिषद प्रशासन व नगराध्यक्षांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन वाढई यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नथुजी चौधरी यांनी केले. कार्यक्रमास माळी समाजातील बांधव-भगिनींसह पालक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले असून समाजाच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देणारा हा उपक्रम ठरला.

Comments are closed.