जैन लेआउटमधील घरावर एफडीएची धाड; लाखोंचा माल जप्त
प्रतिबंधित तंबाखूची सुरु होती विक्री; आरोपी ताब्यात
विवेक तोटेवार, वणी: प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू व सुपारीच्या अवैध विक्रीविरोधात जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभागाने रविवारी, 31 ऑगस्ट रोजी वणी शहरात मोठी कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे जैन लेआउट परिसरातील एका घरावर छापा टाकून एफडीएच्या पथकाने विविध प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा अंदाजे 2 ते 3 लाख रुपयांचा साठा जप्त केला. या प्रकरणी घरमालक तथा कथित तंबाखू विक्रेता मुन्ना वेलेकर याला ताब्यात घेऊन वणी पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, अन्न निरीक्षक सचिन नरवाडे यांच्या नेतृत्वाखालील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाला शहरात प्रतिबंधित गुटखा, तंबाखू व सुगंधित सुपारीचा मोठ्या प्रमाणात साठा करून विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने रविवारी जैन लेआउट परिसरात संबंधित घरावर धाड टाकली. छाप्यादरम्यान घरातील एका खोलीत प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळून आला. यामध्ये रजनीगंधा, पान पराग, राजश्री गुटखा, मजा, ईगल तंबाखू तसेच विविध कंपन्यांच्या सुगंधित सुपारीची पॅकेट आणि इतर प्रतिबंधित पदार्थांचा समावेश असल्याची माहिती आहे.
पथकाने हा सर्व माल जप्त करून त्याची अंदाजे किंमत 2 ते 3 लाख रुपये असल्याचे प्राथमिक स्तरावर सांगण्यात आले. कारवाईनंतर मुन्ना वेलेकर याला जप्त मालासह वणी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मालाचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर संबंधित व्यक्तीविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणात पुढील तपासानंतर आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुन्ना वेलेकर याच्याविरुद्ध यापूर्वीही वणी पोलीस ठाण्यात 3 प्रकरणे दाखल असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. प्रतिबंधित गुटखा व तंबाखूच्या तस्करीप्रकरणी महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही स्तरांवर मोक्का अंतर्गत कारवाईची शक्यता चर्चेत असली तरी, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पोलिसी पुष्टी झालेली नाही.
वणीतील अवैध तंबाखू व्यवसायाच्या नेटवर्कची चर्चा
वणी शहरात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा, तंबाखू व सुगंधित सुपारीची विक्री होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीपासून होत आहेत. अशा पार्श्वभूमीवर एफडीएने केलेल्या या कारवाईमुळे शहरातील अवैध तंबाखू व्यवसायाचे नेटवर्क किती मोठे आहे, याबाबत पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.
या जप्त मालाचा पुरवठा नेमका कोठून केला जात होता, तो शहरात कोणाकडे विक्रीसाठी पाठविला जात होता तसेच या व्यवसायामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे. एफडीए व पोलिसांच्या पुढील तपासातून या अवैध व्यवसायाशी संबंधित आणखी नावे समोर येतात का, याकडे वणीकरांचे लक्ष लागले आहे.


Comments are closed.