पुरुषोत्तम नवघरे, वणी: कार्तिक शुद्ध चतुर्दशी अर्थात वैकुंठ चतुर्दशीच्या पावन पर्वानिमित्त वणी येथील श्री रंगनाथ स्वामी देवस्थानात सोमवार, 23 नोव्हेंबर 2026 रोजी ‘श्री वैकुंठ महोत्सव 2026’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. वैकुंठ चतुर्दशीला श्री रंगनाथ स्वामींचे दर्शन म्हणजे साक्षात वैकुंठ धामाचे दर्शन, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांची मेजवानी भाविकांना अनुभवता येणार आहे.
महोत्सवाची सुरुवात सकाळी 8.30 ते 9.30 या वेळेत ब्रह्मांडनायक श्री गजानन महाराज उपासना मंडळ, वणी यांच्या वतीने सामूहिक उपासनेने होणार आहे. त्यानंतर सकाळी 9.30 ते दुपारी 12.30 या वेळेत विविध दाम्पत्यांच्या सहभागातून श्री रंगनाथ स्वामींच्या मूर्तीचा महाभिषेक, पूजा व अर्चना करण्यात येणार आहे. दुपारी 12.30 ते 3 या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत ह.भ.प. मनुमहाराज तुगनायत व संच यांच्या वतीने विष्णुसहस्रनामावली पठण आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे. सायंकाळी 6 ते 7 या वेळेत श्री यज्ञ सेवा समिती, वणी यांच्या सौजन्याने सामूहिक श्रीसूक्त हवन पार पडणार आहे.
रात्री 7 ते 9 या वेळेत गुरुकुल नृत्य अकॅडमीचे चेतन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली भस्मासुर आणि मोहिनी अवतारातील भगवान विष्णू यांचा अद्भुत प्रसंग नृत्यनाटिकेद्वारे सादर केला जाणार आहे. रात्री 9 ते 12 या वेळेत दीपोत्सव, ब्रह्मोत्सव, छप्पन भोग, हरिहर मिलन आणि महाआरती असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
छप्पन भोगासाठी मिठाई आणण्याचे आवाहन
महोत्सवातील छप्पन भोग नैवेद्य कार्यक्रमासाठी भाविकांनी आपल्या घरून किमान 250 ग्रॅम मिठाई आणावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. परिसरातील सर्व भाविकांनी सहकुटुंब या भक्तिमय सोहळ्यात सहभागी होऊन श्री रंगनाथ स्वामींचे दर्शन, महाप्रसाद आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या संपूर्ण महोत्सवाचे पौराहित्य पं. गोविंद महाराज रुपनारायणजी जोशी (हिंगणघाट), वाघ बंधू तसेच दक्षिण भारतातील वेदशास्त्रसंपन्न पंडितांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.


Comments are closed.