गरीबांची लूट भोवली! वणीतील रेशन दुकानाचा परवाना रद्द

ई-केवायसीच्या नावाखाली प्रत्येकी 20 रुपये घेतल्याची तक्रार

विवेक तोटेवार, वणी: गरीब आणि सर्वसामान्य रेशनकार्ड धारकांकडून ई-केवायसीच्या नावाखाली प्रत्येकी 20 रुपये वसूल केल्याच्या तक्रारीची अखेर दखल घेण्यात आली आहे. वणी शहरातील वॉर्ड क्रमांक 11 मधील संबंधित रास्तभाव धान्य दुकानाचा परवाना जिल्हा पुरवठा अधिकारी, यवतमाळ यांनी रद्द केला आहे. युवा हुंकार संघटनेने केलेल्या तक्रारीनंतर सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, या कारवाईमुळे रेशनकार्डधारकांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्यांना चपराक बसली आहे.

ई-केवायसीच्या नावाखाली रेशनकार्डधारकांकडून प्रत्येकी 20 रुपये आकारले जात असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर युवा हुंकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अजिंक्य सुभाष शेंडे यांनी याबाबत प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. गरीब नागरिकांकडून अशा प्रकारे पैसे आकारणे अन्यायकारक असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली होती.

तक्रारीनंतर पुरवठा विभागामार्फत संबंधित रास्तभाव धान्य दुकानाची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली. या तपासणीत दुकानातील अनियमितता आढळून आल्याचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर महाराष्ट्र अनुसूचित वस्तू (वितरणाचे विनियमन) आदेश 1975 मधील तरतुदींच्या उल्लंघनाबाबत संबंधित दुकानदाराचे प्राधिकारपत्र रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

केवळ परवाना रद्द करून प्रशासन थांबले नाही, तर संबंधित दुकानदाराची 100 टक्के अनामत रक्कम दंड म्हणून वसूल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

या कारवाईचा सविस्तर अहवाल मिळविण्यासाठी अजिंक्य शेंडे यांनी तहसीलदार, वणी यांच्याकडे स्वतंत्र अर्ज केला होता. त्यानंतर तहसीलदार कार्यालयाकडून कारवाईचा अहवाल आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रत उपलब्ध करून देण्यात आली.

रेशन दुकान हे गरीब आणि गरजू नागरिकांना त्यांच्या हक्काचे धान्य उपलब्ध करून देण्यासाठी आहे. ई-केवायसीसारख्या प्रक्रियेच्या नावाखाली नागरिकांकडून अवैध पैसे आकारणे हा गं­भीर प्रकार आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने यापुढेही कठोर कारवाई करावी, अशी भूमिका युवा हुंकार संघटनेने मांडली आहे.

या कारवाईमुळे युवा हुंकार संघटनेच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून, नागरिकांच्या हक्कांसाठी संघटनेने उभारलेल्या लढ्याची वणी शहरात चर्चा होत आहे.

Comments are closed.