लायन्स स्कूलचे खेळाडू राज्यस्तरावर चमकले; विद्यार्थ्यांचा गौरव

बॅडमिंटनपासून क्रिकेटपर्यंत वणीच्या खेळाडूंची दमदार कामगिरी

पुरुषोत्तम नवघरे, वणी : विभागीय आणि राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत वणी लायन्स स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शाळेचा नावलौकिक उंचावला आहे. या यशस्वी खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी शनिवार, 21 नोव्हेंबर 2026 रोजी देशमुखवाडी येथील शाळेत विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार होते. यावेळी शाळा समितीचे उपाध्यक्ष बलदेवजी खुंगर, किशनजी चौधरी, शाळा समितीचे सदस्य, अकॅडमिक डायरेक्टर प्रशांत गोडे, मुख्याध्यापिका चित्रा देशपांडे आणि सुनीता खुसपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यात बॅडमिंटनमध्ये साई सतीश तुराणकर, व्हॉलीबॉलमध्ये कृष्णा संतोष कांबळे, कराटेमध्ये श्रीकल्प सेवक रुढे आणि हँडबॉलमध्ये अभिनंदन मिलिंद घोपटे यांनी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

याशिवाय 17 वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाने स्वरा करंडे हिच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरावर शाळेचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी केली. या संपूर्ण संघाचाही यावेळी गौरव करण्यात आला. विविध क्रीडा प्रकारांतील या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीला नवी उंची मिळाली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

क्रीडा शिक्षकांसह सेवानिवृत्त शिक्षिकेचाही गौरव
विद्यार्थ्यांच्या क्रीडा यशामागे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देणाऱ्या क्रीडा शिक्षकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. किरण बुजोने, अविनाश उइके, रूपेश पिंपळकर, शेखर धुगुल, शरद बद्दमवार आणि नेहा शेख यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शाळेतील सेवानिवृत्त शिक्षिका मीरा योगेंद्र काळे यांचाही विशेष गौरव करण्यात आला.

पालकांच्या वतीने सेवक रुढे यांनी शाळेच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. क्रीडा शिक्षक शेखर धुगुल यांनी खेळाचे महत्त्व विशद करताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात क्रीडाक्षेत्राची भूमिका अधोरेखित केली. अकॅडमिक डायरेक्टर प्रशांत गोडे यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले. बलदेवजी खुंगर आणि किशनजी चौधरी यांनीही यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.

अध्यक्षीय भाषणात संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच खेळालाही महत्त्व द्यावे. जीवनात यशस्वी होण्यासाठी मेहनत, शिस्त आणि चिकाटी आवश्यक असल्याचे सांगत खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चित्रा देशपांडे यांनी केले. सूत्रसंचालन किरण बुजोने यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रवीण सातपुते यांनी केले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून त्यांच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Comments are closed.