सावंगी जुनीत जगदंबा माऊली माता महोत्सव उत्साहात संपन्न

भजन, भारुड अन् नाट्यप्रयोगाने रंगला जगदंबा माऊली महोत्सव

पुरुषोत्तम नवघरे, वणी : तालुक्यातील सावंगी जुनी येथील जगदंबा माऊली देवस्थानात आयोजित 3 दिवसीय माता महोत्सव विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवात परिसरातील भाविकांसह गावातील माहेरवाशिणी, मुली, जावई आणि नातेवाईकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत जगदंबा माऊलीचे दर्शन घेतले.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांवर आधारित भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. भजनाच्या माध्यमातून संतविचारांचा जागर करण्यात आला. दुसऱ्या दिवशी अमरावती येथील भारुडाचार्य सुमित महाराज मेश्राम यांनी भारुड सादर करत मनोरंजनासोबतच समाजप्रबोधन केले. यावेळी जगदंबा माऊली ग्रामदिंडी आणि संत खेमराज पावडे महाराज यांचा दर्शन सोहळाही पार पडला. या कार्यक्रमाला शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मनवर यांची विशेष उपस्थिती होती.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी ग्रामस्वच्छता अभियानाने दिवसाची सुरुवात झाली. त्यानंतर संत दर्शन, जगदंबा माऊलीची महापूजा, ग्रामदिंडी आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. रात्री कैलास नगर, साखरा येथील हौशी नाट्य मंडळाने ‘गरीब बापाची व्यथा’ हे सामाजिक आणि कौटुंबिक आशयाचे नाटक सादर केले. या नाट्यप्रयोगाला उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कलाकारांचे कौतुक केले.

माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांच्या पुढाकारातून या महोत्सवाचे नियोजन करण्यात आले होते. महोत्सव यशस्वी करण्यासाठी देवस्थानचे सेवेकरी, पदाधिकारी, युवक-युवती आणि समस्त ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

धार्मिक श्रद्धेसोबतच संतविचार, समाजप्रबोधन, स्वच्छतेचा संदेश आणि ग्रामएकतेची भावना जपणारा हा माता महोत्सव सावंगी जुनीच्या सामाजिक आणि सांस्कृतिक एकोप्याचे प्रतीक ठरला.

Comments are closed.