कटलीबोरगावचा पाणीप्रश्न 8 दिवसांत मार्गी लावणार !

पाणीटंचाईबाबत आमदार संजय देरकरांकडून पाहणी

पुरुषोत्तम नवघरे, वणी : झरी तालुक्यातील कटलीबोरगाव येथे निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांनी गावाला भेट देऊन पाणीपुरवठ्याच्या परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गावातील पाणीटंचाईचा प्रश्न गांभीर्याने घेत आमदार देरकर यांनी संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि यंत्रणेशी चर्चा केली. येत्या 8 दिवसांत गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना पूर्ण कराव्यात, असे स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

पाणीप्रश्न सोडविण्यासाठी विशेष निधीची आवश्यकता भासल्यास आमदार निधीतून निधी उपलब्ध करून देण्याची तयारी त्यांनी दर्शविली. निधीची तरतूद किंवा तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करून पाणीपुरवठ्याचा प्रश्न प्रलंबित ठेवू नये, असे सांगत गावातील प्रत्येक नागरिकापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी ग्रामस्थांनी पाणीटंचाईमुळे होत असलेल्या अडचणी आणि समस्या आमदारांसमोर मांडल्या. त्यावर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावावा, यासाठी आवश्यक सूचना करण्यात आल्या.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या पाहणीदरम्यान गौरव पंधरे, बाळू दुधकोहळे, मधुकरराव भोयर, बंडू आडे, नामदेव कुडमथे, सतीश कोडापे, सागर कुडमथे, गुणवंत आत्राम, अतुल कुमरे, किरण कोडापे (पोलीस पाटील), चंदा आत्राम (सरपंच, हिवरा बु.), अनिल टेकाम (उपसरपंच), भिमराव टेकाम, भूसेवार, देवीदास अडपावार (ग्रामसेवक), अभियंता मिर्झा, महिंद्रा मेश्राम, इंद्रजीत मेश्राम यांच्यासह संबंधित अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

पाणीटंचाईसारख्या मूलभूत प्रश्नाला प्राधान्य देत 8 दिवसांची कालमर्यादा निश्चित करून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविल्याने आमदार संजय देरकर यांच्या भूमिकेबद्दल ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Comments are closed.