निर्गुडा नदीच्या कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती करा

बर्गे बसवून पाणी अडविण्याची ॲड. अमोल टोंगे यांची मागणी

पुरुषोत्तम नवघरे, वणी : शहराच्या पाणीपुरवठ्याचा महत्त्वाचा आधार असलेल्या निर्गुडा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करून बर्गे (लोखंडी फळ्या) बसविण्यात याव्यात, अशी मागणी ॲड. अमोल पांडुरंग टोंगे यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी 25 नोव्हेंबर रोजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षा विद्या आत्राम यांना निवेदन सादर केले.

वणी शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेता उन्हाळ्यात दरवर्षी पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. अशा परिस्थितीत निर्गुडा नदीवरील कोल्हापुरी बंधारा शहरातील भूजल पातळी टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. मात्र, सध्या बंधाऱ्याची योग्य देखभाल व दुरुस्ती झालेली नसल्याने काही ठिकाणी गळती होत आहे. तसेच बर्गे बसविण्याच्या खाचाही खराब झाल्या आहेत. त्यामुळे नदीतील लाखो लिटर पाणी अडविण्याऐवजी वाहून जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

बंधाऱ्यात पाणी अडविल्यास परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांची जलपातळी टिकून राहण्यास मदत होते. मात्र, वेळेत पाणी अडविण्याची व्यवस्था न झाल्यास नदीपात्र कोरडे पडून आगामी काळात शहराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. यासाठी बंधाऱ्याची तांत्रिक पाहणी करून गळती व तुटफूट दुरुस्त करावी, दर्जेदार बर्गे तातडीने बसवावेत, तसेच बंधाऱ्याच्या साठवण क्षेत्रातील गाळ व कचरा उपसा करून पाणी साठवण क्षमता वाढवावी, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

शहरवासीयांना उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, यासाठी नगरपरिषद प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन युद्धपातळीवर कार्यवाही करावी, असे आवाहन ॲड. अमोल टोंगे यांनी केले आहे. या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार संजय देरकर, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी (महसूल) तसेच माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

Comments are closed.