‘ती’ला न्याय मिळवून देण्यासाठी वणीतील पक्ष, संघटना सरसावल्या
वणीत मंगळवारी संध्याकाळी कॅन्डल मार्च
विवेक तोटेवार, वणी: कठुआ येथील बलात्काराच्या घटनेचा नागरिकांच्या मनात खदखदत असलेला असंतोष आता तीव्र होताना दिसत आहे. या घटनेचे पदसाद आता वणीतही उमटू लागले आहे. आसिफाला न्याय मिळवून देण्याकरीता वणीत मंगळवारी कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं आहे. हा मार्च सायंकाळी सहा वाजता वणीतील शासकीय मैदान इथून काढण्यात येणार आहे. पुढे हा मार्च खाती चौक, इंदिरा चौक, मोमीन पुरा, भारत माता चौक, दीपक टॉकीज, काठेड चौक, म. गांधी चौक, जटाशंकर चौक इथून मार्गक्रमन करून डॉ. बाबासाहेब आबेडकर चौक ते टिळक चौक येथे श्रद्धांजली करून समारोप होणार. वणीतील विश्रामगृहात सोमवारी झालेल्या सर्वपक्षीय आणि सामाजिक संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
काश्मीरच्या कठुवा येथे आसिफा नामक ८ वर्षांच्या मुलीवर माजी महसूल अधिकाऱ्याने अपहरण करुन पोलीस आणि नातेवाईक यांच्यासह अत्याचार करुन तिचा खून केल्याचा आरोप आहे. या नराधमांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना वाचविण्यासाठी मोर्चे काढण्यात येत आहेत. या दोन्ही घटना मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना आहे. या घटनेचा निषेध करून आसिफाला न्याय मिळवून देण्याकरीता सर्व वणीकर एक होत आहे.
ज्या आई जिजाऊंच्या महिलांना लढण्याची ताकद दिली. ज्या महिलांचे प्रेरणास्थान आहेत अशा आई जिजाऊला अभिवादन करून हा मार्च काढण्यात येणार आहे. या मार्चमध्ये सर्व पक्षाचे कार्यकर्ते 20 मेणबत्ती घेऊन येणार आहे व जे या निषेध मोर्चाला जुळणार त्याच्या हातात एक मेणबत्ती देणार आहे. मोर्चात शामिल होणारे आपल्या तोंडावर व कपाळावर काळी रिबिन बांधून निषेध नोंदवणार आहे. या प्रकरणात असलेले दोन आमदार ज्यांनी आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न केला त्यांना अटक करून शिक्षा व्हावी अशी मागणी या मार्चमध्ये करण्यात येणार आहे.
मोर्चाचा समारोप हा उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन होणार आहे. या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मनसे, कांग्रेस, भारिप, संभाजी ब्रिगेड, मुस्लिम परिषद, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, महिलांसाठी कार्य करणाऱ्या विविध महिला संघटना, वकिलांची संघटना तसेच विविध सामाजिक संघटना सहभागी होणार आहे.