डॉ. महेंद्र लोढा यांच्या प्रयत्नातून आणखी एक रस्ता तयार
अवघ्या 72 तासांमध्ये पिसगाव ते देवाळा मार्ग तयार
निकेश जिलठे, वणी: वीस-पंचेवीस सजलेल्या बैलगाड्यांची मिरवणूक निघाली. एकापेक्षा एक जोरदार फटाक्यांची आतषबाजीकडे सर्वांचे लक्ष वेधले. शासन दरबारी दिलेल्या निवेदनाची होळी झाली. मंगलवाद्यांनी संपूर्ण रस्ता निनादला. येणाऱ्या-जाणाऱ्याचं तोंड गोड केलं जात होतं. सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांचीच गावकऱ्यांनी मिरवणूक काढली. यवतमाळ जिल्ह्यातील, मारेगाव तालुक्यातील पिसगाव ते देवाळा या गावांना जोडणारा एक रस्ता तयार झाला. डॉ. महेंद्र लोढा यांच्या प्रयत्नांतून पिसगाव ते देवाळा या गावात अवघ्या 72 तासांत लोकसहभाग व श्रमदानातून रस्ता तयार झाला.
बऱ्याच काळापासून या रस्त्याची दुरवस्था झाली. शाळा, कॉलेज, नोकरी, शेती व व्यवसाय या कारणांकरिता इतर ठिकाणी जायला हा सोयीचा रस्ता होता. मात्र पावसाळा लागताच चिखलाने हा रस्ता जवळपास बंदच होतो. गावकऱ्यांची प्रचंड गैरसोय होते. हा रस्ता तयार व्हावा म्हणून शासन दरबारी गावकऱ्यांनी अनेक अर्ज दिलेत. कितीतरी वर्षे त्यांनी या रस्त्यासाठी शासकीय कार्यालयांचे उंबरे झिजवलेत. शेवटचा उपाय म्हणून मागील आठवड्यांत पिसगाव येथील गावकरी डॉ. महेंद्र लोढा यांना भेटलेत. डॉ. लोढा यांनी गावकऱ्यांची समस्या समजून घेतली. प्रत्यक्ष जाऊन त्या रस्त्याची पाहणी केली. अखेर पिसगाव ते देवाळा हा तीन किलोमिटरचा रस्ता तयार करण्याचं ठरलं. या कामासाठी 19 एप्रिल हा दिवस निश्चित करण्यात आला. डॉ. लोढा यांनी तांत्रिक मदत केली. त्यांच्याच देखरेखीत प्रत्यक्ष श्रमदानातून या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. दहा ट्रॅक्टर्स, एक जेसीबी मशीन व एक रोलर अशी अनेक साधने लावलीत. 500 ट्रॅक्टर मुरूम वापरण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे डॉ. लोढा हे स्वतः गावक-यांच्या खांद्याला खांदा लावून श्रमदानासाठी उतरले.डॉ. लोढा व गावकऱ्यांच्या प्रयत्नांना फळ आलं. अवघ्या 72 तासांत हा रस्ता तयार झाला.
देवाळे ते पिसगाव रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिक खराब झाली होती. रात्री-बेरात्री या रस्त्याने वाहन चालविणे जोखमीचे झाले होते. कित्येक वर्षांपासून गावकरी ही जोखीम पत्करत नाइलाजाने या रस्त्याने प्रवास करत. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यावर कोणतीच उपाययोजना करायला तयार नव्हते. डॉ. लोढा यांच्या पुढाकारातून हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता तयार झाला. सोमवारी 23 एप्रिलला एका छोटेखानी कार्यक्रमात या रस्त्याचं उद्घाटन करण्यात आलं. उद्घाटन प्रसंगी गावक-यांचा आनंद ओसंडून वाहत होता. डॉ. लोढा यांच्या या कार्याबद्दल गावकऱ्यांनी अगदी पारंपरिक पद्धतीने जाहीर सत्कार केला. गावक-यांनी 20 ते 25 बैलगाड्या सजवल्या होत्या. डॉ. लोढा आणि त्यांच्या टिमला या बैलगाडीत बसवून गावात मिरवणूक काढण्यात आली. श्रमदान करणारे सर्वच या मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी फटाके फोडून आणि साखर वाटून गावक-यांनी आपला आनंद व्यक्त केला. यावेळी निवेदनाची होळी देखील करण्यात आली. रस्त्यासाठी गावक-यांनी वेळोवेळी निवेदन दिले होते. त्याची एक भली मोठी फाईल तयार झाली होती. उद्घाटन प्रसंगी या फाईलची होळी करण्यात आली.
रस्त्याच्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मनोज व्यवहारे होते. डॉ. प्रीती लोढा, राजाभाऊ बिलोरिया, प्रा. रविंद्र मत्ते, विजया आगबत्तलवार, संगीता खटोड, शम्स सिद्धीकी, मधुसुदन जगताप, पिसगावचे ज्येष्ठ नागरिक अण्याजी थेरे, राजू पाचभाई, रमेश बावणे, सुखराज राऊत, सुनील रसे, तुळशीराम काकडे, संतोष थेरे, महादेव आगलावे, विलास सिरामे, विलास गोखरे, हरिदास आवारी, यशवंत आस्वले, माया रसे, कविता काकडे, वर्षा झेंगठे, तुळसा आगलावे, रंगूबाई थेरे, लक्ष्मीबाई बावणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि संपूर्ण गाव उपस्थित होते.
रस्त्याचे उद्घाटन करताना आणि बैलगाडीवर काढलेली मिरवणूक
वणी बहुगुणीशी बोलताना पिसगावचे रहिवाशी राजू पाचभाई म्हणाले की…
काम करण्यासाठी केवळ इच्छाशक्तीची गरज आहे. रस्त्याच्या समस्येबाबत आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून लोकप्रतिनिधींची भेट घेत आहोत. शासन दरबारी निवेदन देत आहोत. अनेक आंदोलनं केलीत. मात्र आमच्या मागणीकडे लोकप्रतिनिधींनी कायम दुर्लक्ष केले. डॉ. लोढा यांनी कोणतीही सत्ता नसताना जे नेतृत्त्व करून एवढं मोठं काम केलं त्याला खरंच तोड नाही. व्यवसायाने डॉक्टर असलेले लोढा यांनी जणू याही रस्त्याचे ‘‘ऑपरेशन’’च केले. गावाचे रस्ते ह्या जीवनवाहिन्या असतात. त्या लहान-मोठ्या नसा असतात देशाच्या. त्या डॉ. लोढा यांनी पुन्हा सुरू करून दिल्यात.