झरी नगरपंचायतीच्या विकासकामांचे भूमिपूजन की केवळ प्रसिद्धी !
प्रहार संघटनेचे आसीफ कुरेशी यांचा सवाल
सुशील ओझा, झरी: यवतमाळ जिल्ह्यातील हा आदिवासीबहूल तालुका आहे. अडीच वर्षांपूर्वी येथे नगर पंचायत आली. नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्यात. गावात आता सुधारणांचा आणि विकासकामांचा झंझावात वाढेल अशा अपेक्षा वाढल्यात. मात्र नुकतेच झालेले विकासकामांचे भूमिपूजन हे केवळ प्रसिद्धीसाठीच होत आहे काय? असा सवाल प्रहार संघटनेचे आसीफ कुरेशी यांनी केला आहे. तशी तक्रारही आसीफ कुरेशी यांनी नगर पंचायतीचे सी.ई.ओंना दिली आहे.
या तालुक्यात व गावात नादुरुस्त नाल्या आणि रस्ते ही प्रमुख समस्या आहे. सोबतच येथील बसस्टॅण्ड, सार्वजनिक मुत्रिघर, शौचालय, पिण्याचे पाणी, ग्रामीण रुग्णालय व तेेथील त्रुटी अशा अनेक समस्यांवर उपाययोजना होणे आवश्यक आहे. या तातडींच्या गरजांसाठी युद्धपातळीवर काम होणे आवश्यक आहे. असे असले तरी केवळ भूमिपूजन व जाहिरातबाजी करून प्रसिद्धी लाटण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
नगर पंचायतीच्या अडीच वर्षांच्या कादकीर्दीत उल्लेखनीय असे कोणतेच कार्य झाले नसल्याचे प्रहार संघटनेचे म्हणणे आहे. आता केवळ भूमिपूजनच होत राहतील की प्रत्यक्ष कार्यदेखील होईल याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.