सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः शहरातील वीज लहर आली की कधीही जाते. भर उन्हाळ्यात वीजेचा कहरच सुरू आहे. कितीही वेळ हा वीजपुरवठा हा बंद असतो. त्यामुळे याचा नाहक त्रास वणीकरांना सातत्याने होत आहे. आधीच शहरात पाण्याचा तुटवडा आहे. कुलरचा वापरदेखील लोक काटकसरीनेच करीत आहेत. पण किमान पंख्याची हवा तरी मिळावी अशी माफक अपेक्षा आहे. असे असले तरी कधीही जाणाऱ्या व येणाऱ्या विजेने जनजीवनाला प्रभावित केले आहे.
विजेवर अवलंबून असणाऱ्या अनेक उद्योगांना याचा फटका बसला आहे. मोंटू का ढाबाचे संचालक मोंटू वाधवाणी यांनी सांगितले की, विजेवर चालणारी मिक्सर, ग्राइंडरसारखी उपकरणे वापरणे कठीण झाले आहे. अनेक ज्यूससेंटरर्सच्या चालकांनीदेखील आपली ही व्यथा बोलून दाखविली.
औषधी, आईस्क्रीम, थंड पेय, दूध, फळांचे रस, झेरॉक्स, इंटरनेट, इलेक्ट्रिकल्स अशा अनेक व्यावसायिकांना याचा आर्थिक फटका बसत आहे. इन्व्हर्टर नसल्यास माल खराब होत आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे. वृद्ध, बालक आणि रुग्णांची यामुळे गैरसोय होत आहे. महाराष्ट्राला वीज पुरवठा करणारा वणी, चंद्रपूरातील कोळसा आहे. पण वणी परिसरच वीज वितरण कंपनीचा खंडित वीज पुरवठा दिवसरात्र नागरिकांची ससेहोलपट करीत आहे.