तेलंगणात कत्तलीसाठी जाणाऱ्या 22 बैलाची सुटका
एसडीपीओ पथक व पाटण पोलिसांची संयुक्त कार्यवाही
सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातही पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सुरदापूर येथून तेलंगणात कत्तलीसाठी पायदळ घेऊन जाणाऱ्या 22 जनावरांची सुटका करण्यात आली आहे. वणी उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या पथकाने व पाटण पोलिसांनी संयुक्तपणे ही कार्यवाही केली आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड प्रमाणात म्हशीच्या नावाखाली गोतस्करी सुरू होती. याबाबत वणी बहुगुणी ने वेळोवेळी पाठपुरावा करून शासनाला जागे करण्याचे काम केले. तालुक्यातून माथार्जुन मार्ग सुरदापुर ते तेलंगणा अशी तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गोतस्करीत पांढरकवडा, उमरी, मारेगाव, वणी, कळंब, बोरी(पाटण), झरी व इतर ठिकानातील अनेक गौतस्कर कायर, घोंसा, नवरगाव, वरोरा सह इतर बाजारातून शेतकऱ्यांचे जनावरे कवडीमोल भावात विकत घेतात. ही जनावरे बोगस पावत्याच्या आधारे पायदळ व चारचाकी गाडीने कत्तलीसाठी तेलंगण्यात नेली जाते.
20 मेला पहाटे 4.30 ते 5 वाजताच्या दरम्यान सुरदापुर शिवारात पायदळ तेलंगणात घेऊन जाणारी जनावरे पकडले व जनावर मालकासह तीन जणांना अटक करून कार्यवाही करण्यात आली. या जनावरांची किंमत 4 लाख 40 हजार असून आरोपी जनावर मालक तस्लिम मारेगाव, विलास किसन सुरपाम, दिनेश बाबाराव देठे (20), वासुदेव लालू आत्राम (25), भीमराव चेंडकू आत्राम सर्व राहणार रोहपट ता. मारेगाव यांना अटक करून त्यांच्यावर प्राणी संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर जनावरे रासा येथील गोशाळा येथे पाठविण्यात आले असून ही कार्यवाही ठाणेदार शिवाजी लष्करे, उपनिरीक्षक प्रफुल डाहुले, आशिष टेकाडे, रवी इसनकर, संतोष कालवेलवार, यांनी केली तर तपास जमादार श्यामसुंदर रायके करीत आहे.
विशेष म्हणजे ‘वणी बहुगुणी’ने मारेगाव येथील जनावर तस्कर तस्लिम नामक हा रोहपट मार्ग माथार्जुन, सुरदापुर मार्ग तेलंगणात जनावर तस्करी करीत असल्याचा बातम्या सतत प्रकाशित केल्या होत्या. त्यानंतर तोच जनावर तस्कर व रोहपट येथील तीन मजूर यांना पोलिसांनी पकडल्याने ‘वणी बहुगुणी’ने केलेला खुलासा सत्य ठरले.
परिसरात सुरू असलेली गोतस्करी ही पोलिसांच्या मदतीशिवाय सुरू राहणे अशक्य आहे. गोतस्करांचे आणि पोलिसांचे अर्थपूर्ण संबंध असल्याची चर्चाही परिसरात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे अशा पोलिसांवर देखील कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.