डॉ. लोढा यांच्या प्रयत्नातून तेजापूरवासियांना मिळाला पूल

चंद्रपूरचे अंतर होणार 50 किमीने कमी

0

निकेश जिलठे, वणी: तेजापूर, वणी तालुक्याचं शेवटचं टोक. तालुक्यापासून सर्वात दूर अंतरावर हे गाव आहे. गावात
पैनगंगा नदीला जोडणारा एक नाला आहे. हा नाला शेतीचा आणि पलिकडे असणा-या गावांची वाट रोखायचा. पावसाळा ते
दिवाळी पर्यंत हा रस्ताच बंद राहायचा. गावात उदरनिर्वाहाचं प्रमुख साधन शेती आहे. हा पूल ओलांडूनच शेतामध्ये शेतक-यांना
जावे लागायचे. शिवाय या पुलाचं आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हा पूल यवतमाळा आणि चंद्रपूर जिल्ह्याला जोडतो. त्यामुळे या नाल्यावर पूल बांधावा अशी ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. मात्र त्यांच्या मागणी कधी मान्य झालीच नाही. अखेर
या गावात आता पुलाचं काम सुरू झालं आहे. तेही लोकसहभाग आणि लोकवर्गणीतून आणि त्याला पाठबळ मिळालं ते
सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांचे. आता या पुलाचं काम जवळपास पूर्ण झालं असून
लवकरच या पुलाचा लोकार्पण सोहळा होणार आहे.

सध्या डॉ. लोढा यांच्या पुढाकाराने अनेक गावांमध्ये लोकसहभाग आणि श्रमदानातून रस्ता आणि पुलाचे काम करण्यात आले
आहे. ही बातमी तेजापूर गावातील काही तरुणांपर्यंत पोहोचली. त्यांनी डॉ. लोढा यांची भेट घेतली. संपूर्ण पावसाळा या नाल्यात
पाणी असते. त्यामुळे शेतावर जाण्यासाठी तसेच चंद्रपूर, कोरपना या गावाला जाण्यासाठी संपर्क तुटतो. जर चंद्रपूरला जायचं
ठरल्यास तब्बल 50 किमीचा फेरा पडतो. या पुल शैक्षणिक, आरोग्य आणि इतर दळणवळणासाठी मोठं महत्त्व आहे. ही
समस्या त्यांनी डॉ. लोढा यांना बोलून दाखवली. पुल बनवणे म्हणजे काही पांदण रस्ता बनवण्याइतकं सोप्प काम नव्हतं. डॉ.
लोढा यांनी गावात एक बैठक घेतली. पुलाचं काम असल्याने नागपूरच्या एका सिव्हिल इंजिनियरला संपर्क करण्यात आला. पुढे
या ठिकाणाची पाहणी झाली. लोकांनी काही शक्य असेल तेवढी वर्गणी काढायचे आणि श्रमदान करायचे ठरले. डॉ. लोढा यांनी
गावक-यांना विश्वास दिला की पूल तयार होऊ शकतो. तसेच संपूर्ण सहकार्य करण्याचं वचन दिलं.

गेल्या आठवड्यात या पुलाच्या कामाला सुरुवात झाली. परिसरातील जंगलातून मुरुम आणली गेली. लोकवर्गणीतून आणि गोळा
झालेल्या रकमेतून पुलाला लागणारे साहित्य विकत घेतले गेले. नागपूरवरून इंजिनियर आले. स्वतः सूर्य उगवला की लोकांचे
पाय आपसूकच श्रमदानासाठी पुलाकडे वळायचे. महिला, तरुण यांच्यासोबतच वृद्ध देखील आपलं काम समजून पूल तयार
करण्याच्या कामाला लागले. गावक-यांसोबतच इंजिनियरही संपूर्ण वेळ तिथे थांबायचे. अखेर या या पुलाचं काम जवळपास 95 टक्के पूर्ण झालं आहे.

हा पूल खालच्या भागात आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंनी जवळपास 25 ते 30 फुटांची खोल दरी आहे. पावसाळ्यानंतर जेव्हा नाला
सुकायचा तेव्हा तिथून वाहतूक सुरू व्हायची. मात्र ही दरी इतकी धोकादायक आहे की जीव मुठीत घेऊनच बाईक या
नाल्यामधून काढावी लागायची. गावातील नागरिक सांगतात की केवळ गावातली व्यक्तीच हा नाला बाईकने पार करू शकतो.
नवखी व्यक्ती जर या मार्गाने आली तर त्यांना बाईक काढायला चांगलीच कसरत करावी लागायची. अनेकदा इथे अपघातही
झाले आहेत. मात्र या समस्येवर डॉ. लोढा यांच्या सहकार्यातून आणि गावक-यांच्या श्रमदानातून तोडगा निघाला आहे.

या आधी या पुलाच्या कामासाठी अनेकदा गावक-यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय कार्यालयाचे उंबरे झिजवले. मात्र त्यांच्या
मागणीकडे कायम दुर्लक्ष करण्यात आलं. पुलाचा कोट्यवधींचा बजेट असल्याचं सांगून पुलाच्या कामाला कायम टाळाटाळ केली
गेली. मात्र अखेर श्रमदानातून आणि लोकसहभागातून अतिशय कमी खर्चात हा पुल इंजिनियरची तांत्रिक मदत घेऊन तयार
करण्यात आला आहे.

चंद्रपूरचं अंतर 50 किलोमीटरने कमी, भाविकांची गैरसोय थांबणार
गावक-यांचा बाजारासाठी किंवा शिक्षणासाठी चंद्रपूरशी आणि कोरपन्याशी नेहमी संबंध येतो. चंद्रपूरला जाण्यासाठी गावक-यांना
मोठा फेरा मारून जावे लागायचे. हा पुल तयार झाल्याने आता सुमारे 50 किलोमीटरचं अंतर कमी झालं आहे. त्यामुळे
वेळेसोबतच आता पैशाची देखील बचत होणार आहे. तसेच विदर्भा आणि पैनगंगा नदीचा जवळच संगम होतो. कार्तिक पौर्णिमेला तिथे
जत्रा भरते. भाविक मोठ्या संख्या या जत्रेला हजेरी लावतात. मात्र नाल्यामुळे भाविकांना त्यांचे वाहने नाल्याआधी ठेवून पायी
प्रवास करावा लागायचा. तर काही भाविक गैरसोयीमुळे तीस किलोमीटरचा फेरा मारून वेळाबाई मार्गे जत्रेला यायचे. हा पुल
तयार झाल्याने आता भाविकांची होणारी गैरसोय आता थांबणार आहे.

वणी बहुगुणीशी बोलताना गावातील सरपंच म्हणाले की…..

या पुलाचा केवळ कास्तकार आणि तेजापूर वासियांनाच नाही तर बाहेरगावातील नागरिकांनाही याचा फायदा होणार आहे. नाल्याचा भयावय रस्ता बघून अऩेक लोक त्यांची गाडी परत वळवायचे. तर नवखे लोक रस्ता नाल्याची खोल दरी बघुनच घाबरायचे. मात्र आता हा पुल तयार झाल्याने वेळेची आणि पैशाची मोठी बचत होणार आहे. अनेक वर्षांची आमची पुलाची मागणी डॉ. लोढा यांच्यामुळे पूर्ण झाली त्यासाठी मी सर्व तेजापूरवासियांकडून त्यांचे आभार मानतो. – सरपंच तेजापूर

Leave A Reply

Your email address will not be published.