अखेर घोडदरावासीयांची पाण्यासाठी पायपीट थांबली
डॉ. लोढा आणि लोकसहभागातून गावात पाईपलाईन व नळ
विवेक तोटेवार, वणी: मंगळावर पाणी आहे की नाही याचे अलिकडे प्रयत्न होत आहे. मात्र मारेगाव तालुक्यातील आदिवासी बहुल घोडदरा गावात पाण्यासाठी पायपीट करावी लागायची याची कुणी दखल घेतली नाही. स्मार्टफोन, इंटरनेट, अत्याधुनिक तंत्रज्ञान, घरोघरी पोहोचवण्याचा दावा करत असतानाच साधं पाणीदेखील घरापर्यंत पोहोचत नाही हा प्रचंड विरोधाभास आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एका क्षणात जगाशी आपण संपर्क साधू शकतो. मात्र घोडदरा गावातील लोक अजूनही पाण्यासाठी चांगलीच पायपीट करीत होते. ही बाब राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या निदर्शनास आली. त्यांनी पुढाकार घेऊन लोकसहभागातून गावात पाईपलाईन टाकून गावक-यांची पायपीट थांबवली. बुधवारी सकाळी 9 वाजता डॉ. महेंद्र लोढा यांच्या हस्ते या नळ योजनेचे उद्घाटन करण्यात आले.
घोडदरा हे मारेगाव तालुक्यातील एक आडवळणावरचे गाव आहे. जवळपास 100 घरांची ही वस्ती आहे. गावाबाहेर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती. तिथे असलेल्या बोअरवेलमधून लोक एका हौदात पाणी घ्यायचे व तिथून ते पाणी गावक-यांना घरी न्यावे लागायचे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी गावात पाईपलाईन बसवण्याची मागणी केली होती. मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. जे काम प्रशासकीय स्तरावर व्हायला हवे होते ते काही झाले नाही. अखेर डॉ. लोढा यांच्या पुढाकाराने आणि लोकसहभागातून गावात हौदापासून पाईपलाईन टाकण्यात आली व चौकाचौकात नळ बसवण्यात आले.
या पाईपलाईनद्वारे गावातील 8 ठिकाणी नळाचे स्टँड लावण्यात आले असून आता त्याद्वारे घरांमध्ये पाणीपुरवठा केला जाणार आहे. पाईपलाईऩ लावल्याने आता ग्रामस्थांना 10 घरांमागे 1 नळ मिळाला आहे. बुधवारी नळातून पाणी येताच गावक-यांनी जल्लोष केला. उद्घाटनानंतर डॉ. लोढा यांचा गावक-यांनी सत्कार केला.
डॉ. लोढा म्हणाले की… जल हेच जीवन आहे. हे जीवन सर्वांनाच मिळायला हवे. आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगातही एका गावाला साधं पाणी मिळू नये ही शोकांतिका आहे. गाडगेबाबांनी आपल्या दशसूत्रीत भुकेल्यांना अन्न आणि तहाणलेल्यांना पाणी हे प्राधान्याने सांगितले आहे. तहाणलेल्यांना पाणी देणे हा मानवता धर्म आहे. आणि याच मानवता धर्माचं मी पालन करतो.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश माफुर, सूर्यकांत खाडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामदास नेहारे, बंडू मोरे, दयालाल रोगे, बापुजी चांदेकर, नथ्थुजी पुरके, आनंद जिवतोडे, लक्ष्मण रोगे इत्यादींनी परिश्रम घेतले.