सुशील ओझा, झरी:- शेतक-याने जर बँक व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्यास व्यवस्थापकावर कलम 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करणार असा दम स्वावलंबी शेतकरी मिशनचे किशोर तिवारी यांनी बँक व्यवस्थापकाला दिला आहे. तसेच व्यवस्थापकाने आदिवासी आणि दलित शेतक-यांना त्रास दिल्यास त्यांच्यावर ऍट्रोसिटीची केस दाखल करणार असेही त्यांनी स्पष्ट केले. झरी येथील ग्रामीण बँक आणि महाराष्ट्र बँकेला भेट दिल्यावर त्यांनी व्यवस्थापकाची चांगलीच कानउघाडणी केली. सध्या बँक शेतक-यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याने त्यांनी व्यवस्थापकांना धारेवर धरले.
यावर्षी पावसाने दडी मारल्याने तसेच बोन्डअळीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नात प्रचंड नुकसान होऊन शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. या अनुषंगाने शासनाने शेतकऱ्यांसाठी तालुक्यातील मुकुटबन व परिसराकरिता ७ कोटी रुपये स्टेट बँक व ग्रामीण कोकण बँकेत उपलब्ध करण्यात आले आहे. परंतु बँकेतील व्यवस्थापक व कर्मचारी कागदपत्र बरोबर नाही असे सांगून पीककर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत. शेतकरी हैराण झाले आहे. बँकेबाबत अशा अनेक तक्रारी स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांना प्राप्त होताच बुधवारी २० जूनला दुपारी १२ वाजता झरी व १.३० वाजता मुकुटबन येथील बँकेत त्यांनी भेट दिली.
झरी येथील ग्रामीण बँक व महाराष्ट बँकेला भेट देऊन कारभार पहिला असता तिवारी यांना धक्काच बसला. तर मुकुटबन येथील स्टेट बँकेत गेले असता बँक व्यवस्थापकाचा कारभार बघून त्यांना चांगलेच फाईलवर घेतले. किती शेतकर्यांना पीककर्ज वाटप केले, किती गावे बँकेला जुळून आहे तसेच गावाच्या यादीचा बोर्ड बाहेर का लावण्यात आला नाही अशी माहिती घेतली. शेतकऱ्यांना पीककर्ज मिळावे या करिता ७ कोटी रुपये शासनाने दिले असताना शेतकऱ्यांना बँकेत चकरा मारायला का लावता असा संतप्त प्रश्न करून त्यांनी व्यवस्थापकाला चांगलाच दम दिला. स्टेट बँकेतून शेतकऱ्यांना ६० लाख तर ग्रामीण बँकेतून ५५ लाख रुपयाचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना पीककर्जकरिता ७ कोटी दिले असताना फक्त १ कोटी १५ लाख रुपयांचे वाटप केले आहे. कोणत्याही शेतकऱ्यांना कर्जासाठी त्रास होणार नाही याची दक्षता घ्या अशा सूचनाही त्यांनी व्यवस्थापकाला दिल्या. स्वावलंबी मिशन चे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या सोबत तहसीलदार रामचंद्र खिरेकर मुन्ना बोलेनवार प स सभापती लता आत्राम, सुरेश मानकर, प्रा श्याम बोदकुरवार, मंडळ अधीकारी देशपांडे ,होते तर पोलीस बंदोबस्त मध्ये ठाणेदार गुलाब वाघ, शिवाजी लष्करे सह पोलीस कर्मचारी होते.