शिक्षणव्यवस्था झाली पैसे कमविण्याचा धंदा: श्रुंगारे
छ. शाहु महाराज जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
विवेक तोटेवार, वणी: आजची शिक्षणव्यवस्था भांडवलदारांचे हित जोपासणारी असून केवळ शिक्षणाच्या नावावर पैसा उकळण्याचा धंदा बनत आहे. त्यामुळे होतकरू व मेहनती विद्यार्थी दुर्लक्षित राहतोय. मराठा सेवा संघ सारख्या सामाजिक व वैचारिक संघटनांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते कपिल श्रृंगारे यांनी केले. वणी येथे राजर्षी शाहु महाराज जयंती निमित्त मराठा सेवा संघ, वणी व्दारा गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमात दहावी व बारावी मधील परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सोबतच नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत मुख्याधिकारी झालेल्या निकिता ठाकरे यांचा देखील सत्कार करण्यात आला.
शिक्षण हे जीवनाशी नातं सांगणारं असावं, अन्यायी व्यवस्थेविरुद्ध बोलायला शिकवणारं असावं. परंतु या देशातील राजकर्त्यानी शिक्षणाविषयी कायम अनास्था दाखवली आहे. शिक्षणव्यवस्थेत अमुलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे. असं मत कपिल श्रृंगारे त्यांनी व्यक्त केले.
तर अध्यक्षीय भाषणात ऋषिकांत पेचे म्हणाले की विद्यार्थ्यांचे सत्कार जाती अंतर्गत न घेता सर्व समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार हे एका विचारपिठावर घेण्याचा प्रयत्न करावा. त्याने जाती निर्मुलनाच्या कामी मोठी मदत होणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख. अतिथी प्रकाश नगराळे, जयंत साठे, डॉ. उपरे विचारपिठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहन हरडे, मंगेश खामनकर, संजय गोडे, दत्ता डोहे व सर्व मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.