एका दगडाची कथा….
सुनील इंदुवामन ठाकरे: गावातील एका मुख्य नाल्यावर एक दगड पडला. नाल्यातले पाणी तुंबले. रस्त्यावर आले. रिटायर्ड हेडमास्तर म्हणाले, 100-200 रूपये मजुरी दिली तर कुणीही तो काढून देईल. गावप्रमुखाने हा प्रस्ताव विचाराधीन ठेवला. विरोधकांनी ही पैशांची उधळखोरी आहे म्हणत आक्षेप घेतला.
गावातील मुख्य नाल्याचं पाणी घराघरात शिरायला लागलं. एक म्हातारा म्हणाला, सत्ताधाऱ्यांमुळे तो दगड पडला. याचा भुर्दंड आता बसत आहे. दुसरा म्हातारा म्हणाला, मागील सत्ताधाऱ्यांच्या चुकीमुळे तो दगड मोठा झाला. एव्हाना तो विरघळायला पाहिजे होता.
दगड हलवण्यासाठी 100-200 रूपये खर्च येणार होता. सत्ताधारी व विरोधकांचं काही एकमत होईना. मग गावप्रमुखांनी जाहीर सभा घेण्याचं ठरवलं. गावाच्या मैदानात एक भला मोठा मांडव टाकला. पावसाचे दिवस असल्यानं, स्पेशल वॉटरप्रूफ मांडवाची, खुर्च्या, माईक, बैठक व्यवस्था केली. हजार-दोन हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली.
पहिल्या सत्रात दगड हलविण्याचा खर्च 100-200 रूपयांपेक्षा कसा कमी करता येईल यावर चर्चा झाली. मध्येच एक नेता उसळला. सभेत मागवलेले कोल्ड ड्रिंक्स थंड नसल्याने त्यांने निषेध व्यक्त केला. पुन्हा सभेसाठी 100 कोल्ड ड्रिंक्स मागवण्यात आले. नाल्यात पडलेला दगड हलविण्यासाठी घमासान चर्चा झाली. दुपारच्या भोजनसत्रापर्यंत चर्चा व आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या झडत राहिल्या. गावातले मजूर बोलावण्यापेक्षा शहरातले प्रशिक्षित मजूर बोलावले जावेत असा एक प्रस्ताव आला. या मजुरांसाठी प्रशिक्षण व अन्य व्यवस्था करावी असेही ठरले. एक शिष्टमंडळ तयार झाले. संपूर्ण जिल्ह्यातील मोठ्या शहरांमध्ये जाऊन या शिष्टमंडळाने अभ्यास व सर्वेक्षण केलं.
नाल्यात पडलेल्या दगडाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. शिष्टमंडळाने आपापले रिपोर्टस सादर केलेत. या दगडासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी विशेष सभा घ्यावी अशी सूचना आली. दगड नाल्यात पडल्याने पूर्ण गावात पाणी शिरलं होतं. लग्नाचा सिजन संपल्याने गावात 20-30 हजार रूपयांच्या सवलतीसह एक मॅरेज हॉल मिळाला.
गावातील सगळ्याचं मंडळींना या महासभेला जाता यावं म्हणून स्पेशल गाड्या बूक झाल्यात. टिंकीच्या मायनं, लेकरासाठी दूध, खाण्याचे पदार्थ, कपडे असं भलं मोठं गाठोडं घेतलं. गावप्रमुखानं रागावलं तिला. मग सर्वांसाठी जवळपास 70-80 टक्के सवलतीत जिल्ह्यात होणाऱ्या सभेच्या ठिकाणीच सर्वच वस्तू उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं आणि त्या करूनदेखील दिल्यात.
दगड गावातल्या नाल्यात पडल्यानं जनजीवन पूर्ण विस्कळीत झालं होतं. 100-200 रूपये खर्च होणं ही बाब कुणालाच पटण्यासारखी नव्हती. त्यामुळे जिल्ह्यातल्या विशेष महासभेसाठी अख्खं गाव आलं होतं. जवळपास आठ-दहा दिवस ही महासभा चालेल या अपेक्षेनं सगळेच तयारी आले होते.
सभेसाठी अख्खं गाव आल्यानं निवास व्यवस्था दुसरीकडे करावी लागली. बरं त्यांना सभास्थळी ने-आण करायला स्पेशल गाड्यांची व्यवस्था करण्यात आली. ‘‘शौकीन’’ लोकांनी त्यांची व्यवस्था स्वतःच करावी असं ठरलं.
जिल्ह्याच्या ठिकाणी होणाऱ्या महासभेला आरंभ झाला. 100-200 रूपये खर्च करून तो दगड कसा हलवता येईल यावर पुन्हा चर्चा झाली. पण मध्येच एका जणाने तक्रारीचा सूर लावला. बिर्याणीत पिसेस कमी असल्याचं बोलत त्याने नाराजी दर्शविली. त्याचं मग समाधान करण्यात आलं.
महासभेत अनेक वादळी चर्चा झाल्यात. अनेकांची आवेशपूर्ण भाषणे झालीत. सभेच्या दरम्यान 70-80 वर्षाचा धोंडुजी मेल्याची बातमी आली. नेहमीच देशीत असलेला हा धोंडुजी इंग्लिश टेस्ट करायला निघाला होता. रस्ता क्रॉस करताना हा मेला. सगळी सभाच विस्कटली. धोंडुजीसाठी स्पेशल शोकसभा झाली. काही जणांना हे दुःख अनावर झालं. त्यातील काहींनी देशी तर काहींनी विदेशी पद्धतीनं आपला दुखवटा व्यक्त केला.
धोंडुजी ऐन निर्णयाच्या वेळी मेल्यानं सगळंच काम भसकलं. सगळी महासभा रद्द झाली. गावकरी आपल्या गावात परत आहे. नाल्यातला दगड हलवायला निधी कसा उभारायचा याचा पुन्हा विचार सुरू झाला. गावातील सर्वच लोकांकडून टॅक्स रूपात हा निधी वसूल केला जाईल असं ठरलं. कामाला त्वरित सुरुवात झाली.
करता, करता, पाहता, पाहता पावसाळा निघून गेला. हिवाळ्याने गुलाबी गार पावलाने गावात प्रवेश केला. नाल्यातला दगड तसाच होता. त्या दगडावरून टू व्हिलर, सायकल व पायी चालण्यासाठी एक सोय झाली. हळूहळू तिथे एक नवीन पायवाटच तयार झाली. या मार्गाचं नामकरण करण्याचा गावाने निर्णय घेतला. या दगडाच्या भानगडीत धोंडूजी म्हातारा मेला होता. म्हणून त्याचंच नाव या वाटेला द्यावं असं ठरलं. ‘‘शूरवीर धोंडूजी मार्ग’’ असं नाव दिलं. या मार्गाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी एका मोठ्या हिरोईनला बोलावलं. गोऱ्या गोऱ्या रंगाच्या सुंदर टपोऱ्या डोळ्यांच्या हिरोईनने या मार्गाचं लोकापर्ण केलं. गावातील लोक टाळ्या वाजवू लागले. जयघोष सुरूच होता….. ‘‘शूरवीर धोंडुजी की जय हो…. शूरवीर धोंडुजी की जय हो…. शूरवीर धोंडुजी की जय हो…. शूरवीर धोंडुजी की जय हो….’’
सुनील इंदुवामन ठाकरे
8623053787
9049337606