वणी-अदीलाबाद राज्य महामार्गावरी पूल खचण्याच्या मार्गावर
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अद्यापही दुर्लक्ष
सुशील ओझा, झरी: वणी-अदीलाबाद या राज्य मार्ग क्र. 315 या मार्गावरील मुकुटबनजवळील पूल मुसळधार पावसाने काही प्रमाणात खचला आहे. या मार्गावरून नेहमी अवजड वाहनांची वाहतूक होते. सततच्या पावसाने पूल आणखी जीर्ण झाला असून हा पूल केव्हाही कोसळू शकतो.
मुकुटबनपासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या या पुलाची एक बाजू खचली आहे. पुलाच्या बाजूकडील 100 फुटापर्यंत लांब रोड खालील माती व दगड निघाल्याने पूल केव्हा कोसळणार सांगता येत नाही. तर अर्ध्या पुलावर मोठं भगदाड पडलं आहे. याचा सदर मार्गावरून धावणा-या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
या मार्गावरून झरी तालुक्यातील सर्वच गावे तसेच पाटण, मांगली, लिंगटी, बोरी, सातपेली, पांढरकवडा, अदीलाबाद या गावांशी संपर्क साधला जातो. या पुलाची अवस्था जीर्ण झाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने बऱ्याच वर्षांपासून दुर्लक्ष केल्याने सदर पुलाची अवस्था आणखी बिकट झाली आहे. तरी या पुलाकडे सार्वजनीक बांधकाम विभागाने लक्ष घालावे अशी मागणी चालकांनी आणि परिसरातील लोकांनी केली आहे.