कोडपाखिंडीचे पालक व विद्यार्थी धडकले पंचायत समितीवर
पंचायत समितीमध्ये भरली विद्यार्थ्यांची शाळा
सुशील ओझा, झरी: शाळा सुरू होऊन दीड महिना लोटला. परंतु विद्यार्थ्यांना बसण्याची योग्य व्यवस्था न केल्यामुळे कोडपखिंडी येथील संतप्त ग्रामवासी सर्व विदयार्थी पंचायत समिती मध्ये धडकले व तिथेच त्यांनी शाळा भरविली. दीड महिन्याआधी कोडपाखिंडी येथील जिल्हा परिषद शाळेचे छत कोसळले होते. मात्र अद्याप छताचे काम न झाल्याने संतप्त विद्यार्थी आणि पालकांनी ही भूमिका घेतली.
विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था करून द्यावी ही मागणी घेऊन पालक व विद्यार्थी शुक्रवारी पंचायत समितीवर धडकले. मात्र तिथे मिटींग सुरू असल्याने विद्यार्थाना काही वेळ ताटकाळत बसावे लागले. काही वेळाने मिटींग मधून गटविकास अधीकारी यांनी पालकांची भेट घेऊन शाळेवर येऊन भेट देण्याचे आश्वासन दिले.
संध्याकाळी ५ वाजता गावात गटविकास अधीकारी सुभाष चव्हाण, शिवाजी गवई, सभापती लता आत्राम, पंचायत समिती सदस्य राजेश गोंदरवार यांनी शाळेला भेट दिली. यावेळी पालकांनी मुलांना बसण्यासाठी दिलेली इमारत जीर्ण असून ती कधीही पडू शकते व विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकते अशी तक्रार केली. तसेच सुरक्षित जागेची व्यवस्था करून देण्याची मागणी केली.
यावेळी लवकरच दुसरी व्यवस्था करून देण्याचे तसेच छत पडलेल्या शाळेवर लवकरात लवकर टिन टाकून शाळाही सुरू करू, असे आश्वासन गटविकास अधिकारी सुभाष चव्हाण यांनी दिले. त्यानंतर गावकरी शांत झाले. यावेळी शाळा सुधार समितीचे अध्यक्ष पवन राऊत, सदस्य बाळू टेकाम यांच्यासह पालकवर्ग नामदेव खडसे, गजानन अरके, रमाकांत गेडाम, नितेश खडसे, अरविंद सिडाम उपस्थित होते.
कोडपाखिंडी येथील जिल्हा परिषदा शाळेमध्ये सुधारणा करण्यासाठी जिल्हा परिषद निधीतून मान्सून निधीतून ५ लाख ५० हजार रुपयांचा निधी देण्यात आला होता. अभियंता व कंत्राटदाराने अतिशय जीर्ण झालेल्या भिंतीवर कोणतेही कॉलम न लावता जुन्या विटांच्या भिंतीवर स्लॅब टाकला. परिणामी हा स्लॅब कोसळला होता.