सुशील ओझा झरी: गेल्या 7 दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. याचा फटका जनसामान्यांना होत आहे. तालुक्यातील खातेऱ्याला जाणाऱ्या मार्गावरील पुलावर पुरामुळे मातीचा थर जमा झाल्याने वाहतूक ठप्प झाली. सतत पाऊस सुरू असल्याने खातेरा गावाजवळील पुलावरून रात्रभर पाणी वाहत होते. याच पाण्यात आजू बाजूची काळ्या मातीचा 2 फूट थर जमा झाल्याने खातेरा गावातील जनतेला तसेच विद्यार्थ्यांना बाहेर गावी जाणे कठीण झाले आहे.
पुलावरील चिखलामुळे रस्ता दिसत नाही. चिखलात घसरून पडण्याची भीती निर्माण झाली. गाळ साचल्याने गावतील शाळकरी ३० मुलामुलींना घरी परत जावे लागले होते. सदर पूल हा रोडच्या बरोबरोला असून पावसामुळे माती, काडीकचरा रस्त्यावर येऊन साचतो.
पुलाची उंची वाढवून पुलावरील साचलेली माती साफ करून रस्ता मोकळा करावा अशी मागणी केली होती. पण त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे लहान गाड्यासह चार चाकी, ऑटो, ट्रॅक्टर व शाळेची स्कूल बस जिवाशी खेळ करून काढावी लागते. त्यामुळे त्वरीत पुलावरील माती साफ करून रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी खातेरावासी करीत आहे.