सुशील ओझा, झरी: तालुक्यात दहा दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. गावात सांडपाणी व डबके साचल्याने डासांची उत्पत्ती होत आहे. यामुळे विविध प्रकारचे आजार होण्याची भीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन गेडाम यांनी व्यक्त केली आहे. यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. गेडाम यांनी केले आहेत..
पावसाळ्यात जीवजंतूकरिता अनुकूल वातावरण निर्माण होते. पावसाळ्यात विविध प्रकारचे आजार उद्भवतात. नागरिकांनी पावसाळ्यात शिळे व उघड्यावरील अन्न खाऊ नये. सांडपाणी वाहणाऱ्या नालीत पाणी साचू देऊ नये, पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती होऊन मलेरियासारखे आजार उद्भवतात. दूषित पाण्यापासून डायरिया, टायफाईड आजार बळकावतात. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
यामुळे पावसाळ्यात पाणी उकळून व गाळून प्यावे, डासांपासून बचाव करण्यासाठी मच्छरदाणीचा वापर करावा. घरासभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. पाण्याचे डबके साचू देऊ नये. पिण्याचे पाण्याचे जलस्रोताजवळ पाणी जमा होऊ देऊ नका अशा प्रकारची काळजी घ्यावी, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन गेडाम यांनी केले आहे. .
ग्रामपंचायतींना पिण्याचे पाणी दूषित होऊ देऊ नये अशा सूचनाही दिल्या आहे. साथ रोग उद्भवल्यास त्यावर उपचार करण्यासाठी उपाययोजनाही तालुका आरोग्य विभागाने केली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व गावपातळीवरील उपकेंद्रावर औषधींचा साठा उपलब्ध करण्यात आला, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गेडाम यांनी सांगितले.