विद्यार्थ्यांच्या यशात आईचा सिंहाचा वाटा: एसडीओ प्रकाश राऊत
नगर वाचनालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
जितेंद्र कोठार, वणी: विद्यार्थ्यांनी यशाचं शिखर गाठलं की त्यांचा गौरव होतो. पण या यशामध्ये त्यांच्या आई वडिलांचा सिहाचा वाटा असतो. खरे परिश्रम त्यांचे असतात. असे प्रतिपादन येथील उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांनी केले. ते येथील नगर वाचनालयात पाच संस्थेद्वारा आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात बोलत होते.
मित्र मंडळ, नगर वाचनालय, प्रेस वेलफेअर असोसिएशन, विदर्भ साहित्य संघ व जैताई मंदिराच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधवराव सरपटवार हे होते. व्यासपीठावर येथील विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रा. दिलीप अलोणे, प्रेस वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष गजानन कासावार मित्र मंडळाचे सचिव राजाभाऊ पाथ्रडकर हे होते.
या कार्यक्रमात दहावी व बारावी मध्ये वणी शहरातून सर्वोच्च गुण मिळवणाऱ्या मुलांचा व मुलींचा गौरव करण्यात आला. त्यासोबत मराठी विषयात याच वर्गातून सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रा.अलोणे यांनी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषण करतांना विद्यार्थ्यांच्या या यशाची झलक प्रत्यक्ष त्यांच्या जीवनात दिसावी अशी अपेक्षा माधव सरपटवार यांनी केली.
या प्रसंगी इयत्ता बारावीचे निकुंज सतिश अदानी, संकेत सूर्यकांत मत्ते, आचल रविंद्र पुनवटकर, अंकित केशव नवले, कल्याणी मिलिंद टिपले, दहावीतील ऋतुजा विनोद जेनेकर, सुवर्णा किसन हनुमंते, मानसी रविंद्र कांबळे, सायली किरण बुजोने, श्रद्धा राजू पावडे या गुणवंताचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन कासावार यांनी केले. सूत्र संचालन राजाभाऊ पाथ्रडकर यांनी व आभार अभिजित अणे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता.