देवानंद पवार यांच्यावरील तडीपारीच्या कार्यवाहीचा झरीत निषेध
शेतक-यांची तहसिल कार्यालयावर धडक
सुशील ओझा, झरी: शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीचे निमंत्रक व शेतकरी नेते देवानंद पवार यांच्यावर पोलीस प्रशासनाने बजावलेली तडीपारीच्या कार्यवाहीची नोटीस त्वरीत मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी शेतक-यांनी झरीच्या तहसिल कार्यालयावर धडक दिली.
सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाच्या विरोधात देवानंद पवार यांन कायम लढा दिला आहे. देवानंद पवार यांच्यासारख्या प्रामाणिक शेतकरी नेत्याला तडीपारीचा धाक दाखवून त्यांना दडपण्याचा प्रयत्न करणे हा समस्त शेतकरीवर्गाचा अपमान आहे असे तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
शेतक-यांसाठी न्याय मागणे हा पवार यांचा गुन्हा आहे का? पोलीस प्रशासनाला ते गुंड व घातक व्यक्ती कशावरून वाटतात? सद्यस्थितीत शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. कर्जमाफी फसली आहे. हमीभावाने शेतमाल योग्यवेळी खरेदी केल्या जात नाही. खरेदी केलेल्या मालाचे चुकारे वेळेवर दिल्या जात नाही. शेतक-यांच्या कोणत्याही योजनेची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नाही.
अशा गंभीर परिस्थिती विषयी देवानंद पवार हे शेतक-यांसाठी आवाज बुलंद करीत असतील तर तो गुन्हा कसा ठरतो असा प्रश्नही मुख्यमंत्रीना पाठविण्यात आलेल्या निवेदनात केला आहे.
त्यांच्यावर प्रस्तावीत केलेली हद्दपारीची कार्यवाही तातडीने थांबविण्यात यावी अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. राजकीय दबावात पोलीस विभागाने केलेल्या या कार्यवाहीचा व भाजप सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला.
यावेळी माजी आमदार वामनराव कासावार, यांचेसह राजीव कासावार, राजू येलटीवार, रामन्ना येलटीवार,शुभांगी बेलखेडे, पुरुषोत्तम बद्दमवार, भूमारेड्डी बाजनलावार, निलेश येलटीवार, संदिप बुरेवार, नागोराव उरवते, हरिदास गुर्जलवार, करम बघेले, सुनील ढाले, संजय भोयर, केशव नाखले, मनोज अडपावार, रुपेश द्यागलवार, टिपेश्वर मादेवार, मिनाराम पाईलवार, मुन, सह तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते.