संविधानाची प्रत जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
बसपा, संभाजी ब्रिगेड, चर्मकार संघटनेचे निवेदन
गिरीष कुबडे, वणी: दिनांक 9 ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर काही देशातील समाजकंठकांनी देशाच्या संविधानाची प्रत जाळली तसेच संविधानविरोधी नारे लावले. त्याबाबत बसपा, संभाजी ब्रिगेड आणि संत रविदास चर्मकार मंचद्वारा निवेदन देऊन दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की भारतीय संविधानाच्या अधीन राहून देशातील संपूर्ण कायदा सुव्यवस्था व नागरिकाचे संरक्षण हे भारतीय संविधानाच्या तरतुदी नुसार होत असते. संपूर्ण भारताला एक संघ करून ठेवण्याचा मान हा भारतीय संविधानाला आहे. मात्र दिल्लीमध्ये आरक्षण मुर्दाबाद, संविधान मुर्दाबाद, एससी-एसटी ऍक्ट मुर्दाबाद, आरक्षणखोरोको जुतो मारो अशा प्रकारे घोषणा देण्यात आल्या.
देशातील तमाम एससी, एसटी व्हिजेएनटी अल्पसंख्याक समाजबांधवांच्या आरक्षण व त्यांच्या अधिकाराचा अपमान करीत अश्लील भाषेचा वापर केल्याने सर्व समाजाच्या भावना दुखावल्या आहे. देशातील एकता हक्क, अधिकार, बंधुता व समानतेला न्याय देणा-या संविधानाची होळी केली करण्यात आली. तसेच संविधान जलाव देश बचाव मनुवाद जिंदाबाद अशा घोषणा संविधानाची होळी करताना देण्यात आल्या.
या घटनेचा निषेध करण्यासाठी वणीतील पुरोगामी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. तरी या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेऊन या समाजकंठकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व सोशल मीडियाचा वापर करून देशद्रोहीकृत्याचा वायरल केल्यामुळे आयटी ऍक्ट अंतर्गत त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी संत रविदास महाराज चर्मकार मंच, बहुजन समाज पार्टी आणि संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी आणि वणीचे ठाणेदार यांना निवेदनातून केली आहे. यावेळी मोठ्या संख्येने संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.