वसंतोत्सवातील व्हॅलेंटाईन…
दिवंगत वसंतराव धोत्रे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आकाशवाणीचे माजी अधिकारी तथा डीएनसी मास कम्युनिकेशन डिपार्टमेंटचे एचओडी डॉ. बबन नाखले यांचा पूर्व प्रकाशित लेख
डॉ. बबन नाखले: कृषी, सहकार आणि शिक्षण या तिन्ही क्षेत्रांत उत्तुंग भरारी घेणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख यांची परंपरा समर्थपणे पुढे नेणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे वसंतराव धोत्रे! श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद त्यांना लाभले आणि या तिन्ही क्षेत्रांचा वारसा त्यांच्या पदरी पडला.
पाहता पाहता दहा वर्षे पूर्ण व्हायला आली. 31 मे 1997ला वसंतरावांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा ‘क्रूस’ त्यांच्या खांद्यावर घेतला आणि तो न डगमगता समर्थपणे पेलला. एक दिलखुलास, सरळसोट आणि रोखठोक व्यक्तिमत्त्व म्हणजे वसंतराव धोत्रे पण, त्यासाठी त्यांची जवळीक आणि मैत्री साधणे आवश्यक असते. खरंतर जवळीकीतूनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू समजून येतात.
वसंतराव धोत्रे! पांढऱ्या शूभ्र पोषाखातील आपादमस्तक व्यक्ती. दिवसभरातील बैठकांचा थकवा चेहऱ्यावर जाणवत होता. वयाची सत्तरी गाठलेल्या व्यक्तीनं अशा वेळी म्हटलं असतं, ‘जरा आराम करतो, मग बोलू.’….. पण नाही.
मी मुलाखतीसंबंधी बोललो. चहा आला. मी म्हणालो, ‘थकवा आला असेल तर थोडा आराम करा, नंतर बोलू’, तर उत्तरले, अशा मिटिंगा रोजच चालू असतात. कधी आकोट तर कधी अकोल, कुठं एल.ई.सी. तं कुठं मॅनेजमेंट. हे सगळं पाहावंच लागते ना!
मग आपण आतमध्ये बसायचं का? मी.
नाही, नाही, आपलं सगळं आयुष्य असं खुल्लमखुल्लाच अस्ते.
नाही, कोणी आलं गेलं तर….. जरा डिस्टर्ब होईल म्हणून.
असं कोणी येत नाही आन् जात नाही. ज्यांना काम असन थे येऊन बसतीन, वाट पाहतीन.
असं बोलणं चालू असतानानाच बरीच मंडळी हॉलमध्ये मुकाट्यानं येऊन बसलीत.
एवढ्या हॉल पूर्ण भरलेला. आता उभं राहणाऱ्यांची गर्दी सुरू झालेली…. आमची मुलाखत सुरू झाली.
अध्यक्षपदाच्या 10 वर्षांच्या काळात आपल्या नेतृत्त्वाखाली चिरस्थायी आणि संस्मरणीय राहील, असं कोणतं काम झालं? – असा प्रष्न करताच… वसंतरावांची इनिंग सुरू झाली.
सर्वात मोठं काम आमच्या कारकीर्दीत पूर्ण झालं. ते भाऊसाहेबांच्या स्मृतिमंदिराचं! लोकंाच्या, कर्मचाऱ्यांच्या सहभागातून, श्रमातून हे कार्य पार पडलं. याचा मला अभिमान आणि आनंद आहे. हे पाहा, आतापर्यंत 1932 पासून या संस्थेला दिवंगत भाऊसाहेब देशमुख, बाबासाहेब घारफळकर, रावसाहेब इंगोले आणि दादासाहेब काळमेघ हे चार अध्यक्ष लाभले. मी पाचवा अध्यक्ष. आम्ही सर्व पदाधिकारी, कर्मचारी आणि आजीव सभासदांनी एक संकल्प सोडला की, भाऊसाहेबांच्या जीवनकार्याचं जिवंत स्मारक उभारण्यासाठी तनमनधनाने सर्वांन सहकार्य करावे. तशी विनंती आम्ही सर्वांना केली.
या स्मृतिभवनासाठी एक स्पर्धा जाहीर केली. त्यासाठी सुमारे 25 डिझाईन्स आलेत. एका तज्ज्ञांच्या समितीनं परीक्षण करून त्यातल्या दुसऱ्या क्रमांकाचं डिझाईन (प्रथम क्रमांक कुणालाच दिला नव्हता) मंजूर करण्यात आलं. ते होतं अमरावतीच्या शैलेंद्र कोल्हे या आर्किटेक्टचं. सुमारे तीन कोटी रूपयांचा निधी उभारून हे स्मृतिभवन पूर्ण झालं. सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या 15 दिवसांचा पगार निधी म्हणून दिला आणि 27 डिसेंबर 2005 ला भाऊसाहेबांच्या जयंतीला केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते त्याचा लोकापर्ण सोहळा संपन्न झाला. हा आमच्या कारकीर्दीतला कळसाध्याय…. संस्मरणीय दिवस आम्ही समजतो.
म्हणजे….. मी मध्येच बोलण्याच्या आत वसंतरावांनी आणखी पूरक माहिती पुरविली.
अॅट अ ग्लान्स भाऊसाहेब लोकांच्या समोर उभे राहावे म्हणजे त्यांच्या ‘लाईफ अॅण्ड वर्क’ त्यांच्या जीवनकार्याचं दर्शन व्हावं, यासाठी स्मृतिभवनाची योजना आम्ही पूर्णत्वास नेली आहे.
याशिवाय भाऊसाहेबांच्या नावाने मेडिकल कॉलेज सुरू केलं. त्याबद्दल!
ते अगोदरच्या अध्यक्षांचं काम होतं. आम्ही त्याचा आणखी विस्तार केला. इमारत आणि इतर अत्याधुनिक सामग्रीनं ते सुसज्ज केलं एवढंच.ज्याचं क्रेडीट त्याला दिलं पाहिजे. हा लोप पावत चाललेला गुण धोत्रेंच्या बोलण्यात दिसून आला. पुढं तर त्यांनी कामांची जंत्रीच नोंदविली. अकोल्याचं इंजिनिअरिंग कॉलेज स्वतंत्र आणि प्रशस्त जागेत आकारास आलं. नागपूरच्या शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या नवीन वास्तूचं (डॉ. सुर्वे यांनी दिलेल्या 35 लक्ष रूपये देणगीतून) बांधकाम, अनंत जलतरण स्मृती तलाव, हे तर झालंच, या शिवाय आमच्या संस्थेच्या सर्व शाळा, महाविद्यालये (265 वास्तू) ज्या जीर्ण झाल्या होत्या त्या शाळांचं बांधकाम नव्यानं आम्ही केलं. आता एकही वास्तू (पूर्वीच्या तट्ट्यांची किंवा कच्ची) शिल्लक राहिली नाही आणि आम्ही ठेवली नाही.
वसंतरावांच्या बोलण्यात ‘मी’ पेक्षा ‘आम्ही’ हा शब्द वारंवार येतो. ही सहकाराची, सहकार्याची आणि सांघिकतेची भावना विशेषत्त्वाने जाणवली.
आणखी म्हणाल तर, म्हणायला 265 पतसंस्था पण, या सर्व ठिकाणी गुणवत्तेशी काहीच संबंध राहिला नव्हता. आम्ही नवनवीन उपक्रम राबवून जास्त भर दिला. 265 संस्थांना 365 दिवसांत प्रत्येकी सात वेळा भेटी दिल्या. रिटायर्ड इन्स्पेक्टर्स आणि ऑडिटर्सच्या नेमणुका केल्यात. शिस्त लावली. कडक शिस्तीचं फळ आमच्या पदरी पडलं. 16 प्राचार्यांच्या नेमणुका आमच्या काळात झाल्या. सगळे तरूण प्राचार्य उत्कृष्ट ठरले. त्यांनी नावलौकिक कमावला आहे. सर्व कॉलेज नॅकच्या स्पर्धेतून कुठं पंचतारांकित तर कुठं चार तारांकित आणि इतर बी, …. पर्यंत नामांकित झाले. नागपूरचे विज्ञान महाविद्यालय तर ‘फाईव्ह स्टार’! सगळ्याा भारतात चमकलं, तुम्हाला माहीत असेनच. आता संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढीत अधिक प्राधान्य दिलं आहे.
आमचं कृषी महाविद्यालय आणि दोन नवीन शेतीशाळा, तसंच बायोटेक्नॉलॉजी आण हॉर्टिकल्चर या कॉलेजेसची वाटचाल जोमानं सुरू आहे. अहो, चित्रकला, संगीत, खेळ या शाखाही आम्ही विविध ठिकाणी सुरू करून विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गोडी निर्माण केली आहे. सर्वांगिण प्रगती करणारा विद्यार्थी असावा, अशी आमची इच्छा आहे.
राजकारणात कसे काय आलात? … या प्रष्नाला त्यांचं उत्तर मोठं मार्मिक आहे.
हे पाहा! जीवनात सर्व काही अनपेक्षित घडलं. अकोला तालुक्यातील पळसोबढे या गावी जन्म झाला 1937 साली. तिथं पुढचं शिक्षण नसल्यानं अमरावतीला आलो. 1960 साली बी. कॉम. झालो. घरची शेती असल्यानं वडलांनी शेतीचा कारभार हाती दिला.
मग शेतीत काही तुम्ही रमला नाहीत! – मी.
नाही, तसं नाही. शेती करूनच बाकी उद्योग सुरू होते ना! कका राजकारणात होते. 1952 ते 57 आमदार राहिले. त्यांच्यासोबत येणं जाणं होत राहिलं आणि नकळतच सहकार क्षेत्रात पदार्पण झालं. आमचे त्यावेळचे नेते होते आबासाहेब खेडकर. मधुसूदन वैराळे, सपकाळ, डॉ. कोरपे. या मंडळींचा सहवास लाभला आणि पहिली राजकारणाची, सहकाराची पायरी चढलो ती अकोला सहाकारी जिनिंग प्रेसिंग संस्थेची. सतत 21 वर्षे म्हणजे 1965 पासून 1986 पर्यंत अध्यक्ष राहिलो. सहकारातील सर्व क्षेत्रे मग मोकळी झाली.
हे सगळं सहकार क्षेत्रातलं काम वसंतराव पण, सक्रीय राजकारणातला प्रवेश तुमचा…..
सांगतो ना! तोही असाच अनपेक्षितच झाला, हा तरूण पोरगा सहकारात चांगलं काम करतो, असं चित्र होतं. राजकारणात पायरी पायरीनं चढावं लागते. 1967 साली जिल्पा परिषदेचा सदस्य झालो. अविरोध निवड झाली होती. तीन टर्म सदस्य होतो. दिवंगत मधुसूदन वैराळे यांच्या आग्रहावरून 1985 साली आमदार झालो बोरगाव मंजू विधानसभा मतदारसंघातून. हा माझा खऱ्या अर्थानं सक्रीय राजकारणतला प्रवेश.
मग मंत्री कसे झालात?
मंत्री व्हासाठी पह्यले एमएलए व्हावं लागते ना! त्याची एक गंमतच आहे. शंकरराव चव्हाण यांना मुख्यमंत्री म्हणून इंदिरा गांधींनी नेमलं. त्यावेळी आमदार निवासात फोन आला. फोन राजभवनातून होता, कोणी महाना साहेबांचा. मला वाटलं की, कोनी मजाक करत असन… अकोला जिल्ह्यात तसे लय ‘खुटीउपाड’ आहेत. राजभवनातून धोत्रेले कोन फोन करतेच, पण, गोष्ट खरी होती. दाढी, आंघोळ न करता राजभवनावर गेलो. तिथं सांगण्यात आलं की, दुपारी राजभवनावर शपथविधी आहे. मी हबकूनच गेलो. 1986 ते 1988 या काळात सहकार, वन आणि रोजगार हमी योजना या खात्यांचं मंत्रीपद निष्ठापूर्वक सांभाळलं. सहकारातून सक्रिय राजकारणात शिरण्याची ही अशी झाली गोष्ट.
पण, वसंतराव, मग बराच काळ निवृत्तीत गेला तुमचा. राजकारणात परत आला नाहीत…. मी.
आमचं नाव धोत्रे! धोत्रे, सपकाळ, कोरपे, वैराळै हे कुटुंब राजकारणापासून कधी बाद होत नाही. कुठं ना कुठं सुरूच असते. हे आपलं अस्तित्त्व टिकवून आहेच.
मग शिक्षणक्षेत्रात कशी काय एन्ट्री झाली?
तीही अनपेक्षितच! तो काळ श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा कठीण काळ होता. दादासाहेब काळमेघ हे अध्यक्ष असताना असंतुष्टांनी मोठा गहजब केला. कोर्ट, कचेऱ्या, भांडणं यातच श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा कारभार चालला होता. एक दिवस अचानक दादासाहेबांचा फोन आला. मदन गावंडे, नानासाहेब टाले या सर्वांनी आग्रहानं बोलावून घेतलं. दादासाहेबांचा तो ‘फोन’ नव्हता तर तो ‘हुकूम’ होता. ‘राहावं लागते अध्यक्षपदासाठी उभं. म्या सिलेक्ट केला ना! मले भविष्य समजते. चला फॉर्म भरा!’ माझी पंचाईत झाली. मी दुसऱ्या पॅनलच्या विनीत यादीत होतो. 31 मे 1997 चा दिवस मतमोजणी सुरू. आमसभा सुरू करा. दादासाहेबांचा आवाज गुरगुरला. इकडं आमचा एक एक माणून पडून राह्यला. तरीपण साहेब हिंमत देत होते. ‘पेटीतलं समजतं ना मले. तू फिकीर करू नोको.’ अध्यक्ष निवडून आलो. दादासाहेब खरे ठरले. हा चमत्कारच होता लोकशाहीतला.
ही सगळी कसरत तुम्ही कशी काय सांभाळली?
हे पाहा, ज्याले को-ऑपरेटिव्ह चालवता येते, त्याले सगळं काही जमते. मला कोणी मुर्ख बनवू शकत नाही, हे सर्वांना समजलं आणि शिवाजी सोसायटीत सर्व काही आता सुरळीत चाललंय… कुठं कधी कधी खुट्टं होतं. एवढ्या मोठ्या रामरगाड्यात हे चालणारच. ही सगळी सिझनल वळवळ राह्यते गांडुळासारखी. इलेक्शन आहे ना पुढं… तुम्हाले तं माहीत आहे सगळं! 265 संस्था, पाच हजारांवर कर्मचारी, 115 कोटीचं बजेट, अनंत अडचणी आणि कटकटींवर मात करून हा ‘शिक्षणाचा डोलारा’ आम्ही सांभाळून आहो, काय हो! समोरच्या मंडळींना उद्देशून वसंतराव बोलतात.
एवढ्यात एक लक्ष्यवेधी व्यक्ती आत येते. वसंतराव ‘या, या’ म्हणून स्वागत करतात.
साताऱ्याची रयत शिक्षण संस्था आणि त्याच बरोबर श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा उल्लेख होतो. या तुलनेत शिवाजीचं कार्य कसं? या प्रश्नावर वसंतराव गंभीर होतात.
त्याचं असं आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केलेली रयत संस्था. त्याची रचनाच वेगळी आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार आणि सध्या एन. डी. पाटील यासारखे कडक शिस्तीचे प्रशासक या संस्थेला लाभले. त्यांचं संचालक मंडळ 15 लोकांचं. त्यामुळे सर्व कारभार व्यवस्थित चालतो. तीच गोष्ट अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची, आखाड्याची. तिथंही एक छत्री राज्य चालते. इथं गोष्ट निराळी आहे. इथं सुमारे अडीच हजार आजीवन सदस्यांची मर्जी सांभाळावी लागते. दर पाच वर्षांनं लोकांपुढे जावं लागते. आमचा चपराशीसुद्धा व्होटर असतो. सर्वांची मर्जी सांभाळण्याची कसरत म्हणजे सर्कस चालवणं कठीण जाते. हा आमच्यात नं त्यांच्यात फरक आहे. काहो, शेखावत!
समोरची व्यक्ती डॉ. शेखावत होती, हे नंतर कळलं. डॉ. शेखावत, बबनराव मेटकर, डॅडी देशमुख ही मंडळी आमची सोबती. त्यांनीच आजचा हा कार्यक्रम जमवला. याला माझी ‘कन्सेंट’ घेतली नाही.
यावर शेखावत बोलले, घरच्या माणसाचा वाढदिवस. स्वागत करण्यासाठी मंजुरी घ्यावी लागते काय? यावर धोत्रे स्तब्ध झालेत्र ‘ते करतील तसं’ एवढंच बोलले.
बोलण्यात, वागण्यात जशी जरब तशीच भाषणातसुद्धा. योद्ध्याला जसं रणांगणात पाहावं म्हणतात तद्वतच, वक्त्याची ओळख भाषणात होते. कॉलेजचं गॅदरिंग असो की, साहित्य संमेलन, मॅरॉथॉन रेस असो की, खाजगी बैठक, सर्वांना वसंतराव धोत्रेंचं भाषण हवंहवंसं वाटते.
भाषणातून विनोद आणि टाळ्यांचा सुकाळ असतो.
तुमचं भाषण ‘गर्दीसाठी आणि दर्दींसाठी’ सारखंच असते, असं विचारताच, वसंतराव जोर देऊन बोलतात, हे खरं आहे. मायबोलीतून बोलता आलं पाहिजे. ते सर्वांना समजते आन् पटते. खंर म्हनान तं मी मनातून बोलतो. ते लोकांच्याही मनातंच असते. बोलीभाषा ही बनावट नसते. ती सरळ काळजाले भिडते. आता तुम्ही विचारता म्हणून मी ‘मला तुला बोललो’ नाही तर आपलं सारं ‘मले, तुले, आम्हाले’ असंच असते. आता आपल्या वऱ्हाडीची लकबच अशी आहे का ‘विनोद’ आपोआपच होत असाते. लोकांना ते आवडतं, आणखी काय? …. साहित्य संमेलनात वऱ्हाडी बोलीच भाव खाऊन जाते, हा तर आपल्या सर्वांचा अनुभव आहे ना!
तुम्ही हाडाचे शेतकरी, विदर्भातील शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त होण्यासाठी कषाची गरज आहे, असं विचारताच वसंतराव धोत्रे म्हणाले, ही झोनिंग पद्धती बदलली पाहिजे. हे पाहा, एखाद्या जमिनीची विक्री करताना सरकार त्यांची स्टॅम्प ड्युटी ठरवते. 20 हजार रूपये एकर परंतु, आमची कर्जपद्धती कशी? तर एकरी तीन हजार रूपये कर्ज. एखाद्याकडे 10 एकर जमीन असेल तर 30 हजार रूपये कर्जासाठी त्याची अख्खी जमीन बँक गहाण करून टाकते. तो जर डिफॉल्टर झाला तर दुसरी कोणतीच बँक त्याला कर्ज देत नाही आणि मग त्याला सावकाराकडे जावं लागते. जर त्याच्या जमिनीची किंमत 20 हजार रूपये एकर असेल (स्टॅम्प ड्युटीप्रमाणे) तर दोन एकरांत त्याचं कर्ज फिटते.
आणखी एक एकर विकून तो आपला खर्च करून टाकीन. तुम्ही त्याची सगळी जमीन गहाण करून त्याला रस्त्यावर आणता. हा कोणता न्याय? शेतमजूर, रोजगार हमीवर जाणारा, दिवाळं काढणारा व्यापारी हे कधी आत्महत्या करतात काय? असे अडचणीत येणारे शेतकरी आपली पत, प्रतिष्ठा जाते म्हणून आत्महत्या करतात. हे थांबवलं पाहिजे. त्याची मानसिकता बदलणं आवश्यक आहे. गरिबीतून नव्हे तर प्रतिष्ठेला धक्का बसतो म्हणून तो जीव द्यायला लागतो. मोठेपणाचा आव, बडेजाव विसरण्यास ‘कुणबी’ तयार होत नाही. त्याची मानसिकता बदलणं आजची खरी गरज आहे. गरिबी जिद्दीनं जगण्यासाठी बळ देते. प्रतिष्ठा जीव देण्यास भाग पाडते. ते म्हणतात ना, श्रीमंती आली तं माजू नये अन् गरिबी आली तं लाजू नये.
शेतमालाच्या भावासंबंधी तुम्ही काय सांगाल?
त्याचं गणित अगदी स्पष्ट आहे. आता हमीभाव नको. शेतकऱ्यांना गरजेप्रमाणे भाव द्यायला पाहिजे. सरकारी नोकरांना जसा महागाई भत्त्यानुसार पगार मिळतो तसा, आमच्या शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे भाव शेतकी मंत्री ठरवत नाही, तर अर्थमंत्री ठरवतात, ही शोकांतिका आहे.
तो दर क्विंटलला 10 रूपये, अशा कासवगतीनं वाढतो. एखादेवेळी अन्नधान्याचे बाजारभाव 10-20 रूपये क्विंटलला वाढले तर केवढी बोम्बाबोम्ब होते. टोमॅटो 40 रूपये किलो झाले तर अख्खी दिल्ली रस्त्यावर येते. गॅस सिलिंडर वाढले, पेट्रोल-डिझेल वाढलं, तर मुकाट्यानं चूप बसता. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेणारे आणि त्यासाठी आमदारकी, मंत्रीपद सोडणारे प्रतिनिधी आता शोधून सापडत नाहीत. आता डिलिमिटेशनमुळे तर सगळे शहरी प्रतिनिधी होणार आहेत. निवडून येतात खेड्यातल प्रतिनिधी म्हणून परंतु, एक तरी वावरातून चालला आहे काय?….
लोडशेडिंग, पाणी, सेझ हेही प्रश्न शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाचे बनले आहेत?…. माझा प्रश्न.
हे सगळे मरणाचेच प्रश्नआहेत शेतकऱ्यांचे. जलसिंचन म्हणजे इरिगेशन डिपार्टमेंट हे वॉटर सप्लाय डिपार्टमेंट बनलं आहे. शहरासाठी शेतीसाठी कुठून पाणी येणार? विजेसाठी तं मारामाऱ्या होणार आहेत. सेझ म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोनला, विकासाला विरोध नाही पण, हे चोरून लपून होऊ नये. शहरात आणि खेड्यांत पाणी, वीज यांचं समतोल वाटप झालं पाहिजे. विकासाच्या नावावर एखाद्याला डिस्प्लेस करणे बरोबर नाही. जमिनीच्या सिलिंगच्या कायद्यानं विदर्भातला शेतकरी बेजार आहे. त्याला आणखी किती यातना देणार? हा सवाल आहे. देशातली सत्तर टक्के जनता नागविली जात असताना ‘ग्रोथरेट’ वाढविण्याच्या गोष्टी करता, यासारखी खोटी गोष्ट नाही….. वसंतराव उद्वेगानं बोलतात.
आताशा संपूर्ण हॉल भरून गेला होता. बरेच जण खोळंबले होते. हे असं चौफेर बोलणं त्यांनासुद्धा ऐकावंसं वाटत होतं. तरी एका वार्ताहरानं न राहवून विचारलंच! आता मे महिन्यात येणाऱ्या सोसायटीच्या इलेक्शनचं काय?
आहो, आजच्याच कार्यक्रमाला माझी कन्सेंट नव्हती. मे महिन्याचं काय सांगता! आज तरी काही ठरवलं नाही. काहो शेखावत ! …. असं म्हणून घंटी खणखणली. तिष्ठत बसलेली मंडळी पुढं सरकली. चहा आला…. अन् वसंतराव संस्थेच्या कार्यात पुन्हा गुंतले.
14 फेब्रुवारी हा दिवस सर्व जगभर ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा होत आहे. प्रेमाचा संदेश देणारा हा दिवस. आजचा वसंतराव धोत्रे यांचा 71 अभिष्टचिंतन सोहळा सर्वांना सुखावून टाकणारा ‘वसंतोत्सव’ ठरो, हीच सदिच्छा!
(लेख साभार)
डॉ. बबन नाखले
9423680607