एकीकडे आईच्या मृत्यूची बातमी, तर दुसरीकडे नोकरीची अंतिम मुलाखत

परिस्थितीवर मात करत वणीतील नीरज बनला बँक अधिकारी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: घरची परिस्थिती बेताचीच. त्यातच आईचा आजार, मात्र तो परिस्थितीशी घाबरला नाही. नोकरीसाठी अंतिम मुलाखत होती. त्याच वेळी आईच्या मृत्यूची बातमी त्याला मिळाली. मात्र मानसिकरित्या तो खचला नाही. अखेर या सर्वांवर मात करीत तो बँकेत अधिकारी झालाच. कितीही कठिण, प्रतिकुल परिस्थिती असली तरी  जिददीला परिश्रमाची जोड असली की यशाला सहज गवसणी घालता येते. हेच वणीतील नीरज धवंजेवार या होतकरू तरुणाने दाखवून विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे. नीरजचे नुकतेच बँक ऑफ महाराष्ट्रच्या मॅनेजर (पीओ) पदी निवड झाली आहे. नीरजच्या यशाचे परिसरात कौतुक होत आहे. नीरज हा शहरातील ज्येष्ठ पत्रकार राजू धवंजेवार यांचा मुलगा आहे.

नीरज राजू धवंजेवार हा वणीतील रंगारीपुरा येथील रहिवासी आहे. आई, वडील, बहिण, भाऊ असे नीरजचे चौकोनी कुटुंब. बहिणीचे लग्न झाले. वडील राजू धवंजेवार हे पूर्णवेळ पत्रकार आहे. घरची परिस्थिती बेताचीच म्हणता येईल अशी आहे. नीरजला लहानपणापासूनच अभ्यासात गोडी होती. नीरजने प्राथमिक शिक्षण बालविद्या मंदिर शाळेतून पूर्ण केले. तर दहावी एसपीएम शाळेतून पूर्ण केले. दहावी इंग्रजी मीडियम मधून पूर्ण केल्याने व समाधानकारक मार्क्स मिळाल्याने त्याने 11 वी 12 वी करण्याऐवजी प्रोफेशनल कोर्सला पसंती दिली. त्यासाठी बालाजी पॉलिटेकनिक सावर्ला येथे प्रवेश घेऊन 2017 मध्ये पॉलिटेकनिक पूर्ण केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पॉलिटेकनिक नंतर नीरजने नागपूर येथील आबा गायकवाड पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे बीई (इलेक्ट्रिकल्स) ला प्रवेश घेतला. मात्र घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याला नागपूर येथे राहणे, रेग्युलर कॉलेज करणे अशक्य होते. त्यामुळे गरज असेल तेव्हाच कॉलेजला हजेरी लावायची व इतर दिवशी घरूनच अभ्यास करायचा, अशी पद्धत त्याने स्वीकारली. जिद्दीने अभ्यास करून त्याने 2020 मध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केले.

2020 साली कोरोना महामारी आली. त्यामुळे नीरजने स्टाफ सिलेक्शन, विद्युत वितरण, रेल्वे इत्यादी विभागातील टेक्निकल पोस्टसाठी तयारी सुरु केली. मात्र या विभागाची नोकर भरती बंद असल्याने त्याने बँकिंगची तयारी करण्याचा निर्णय घेतला. शहरातील आयकॅन करियर अकॅडमीमध्ये बँकिंगचा क्लास लावला. पुढे अभ्यासासाठी चंद्रपूर गाठत तेथील अभ्यासिकेत बँकेच्या परीक्षेचा अभ्यास सुरु केला. त्यात त्याला यश ही मिळाले व विदर्भ कोकण ग्रामीण बँकेची क्लर्कची परीक्षा तो उत्तीर्ण झालो.

मुलाखतीच्या दिवशीच आईचे कॅन्सरने निधन
क्लर्कपदी निवड झाली तरी अधिकारी व्हायचे स्वप्न असल्याने त्याने आयबीपीएसच्या परीक्षेची तयारी सुरू केली. त्यात तो उत्तिर्ण झाला. ज्या दिवशी मुलाखत होती त्याच दिवशी त्याच्या आईचे कँसरने निधन झाले. कुटुंबीयांनी ही माहिती त्याच्या पासून लपवली. मात्र माध्यमातून त्याच्या पर्यंत ही बातमी पोहोचली. या परिस्थितीतही त्याने मुलाखत दिली. पुढच्या काही दिवसात इतर बँकेच्या मुलाखत पण दिली. अंतिम निकाल आला व नीरजची बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मॅनेजर (पीओ) पदी निवड झाली.

आईचे एक स्वप्न पूर्ण करण्याचे समाधान
परीक्षेच्या एक दोन महिने आधी नीरजच्या आईला कॅन्सरचे निदान झाले. आईची तब्येत दिवसेंदिवस खालावत होती. मृत्यू आधी परीक्षेत यश मिळवण्याचे वचन नीरजने आईळा दिले. सर्वात आधी ग्रामीण बँकेच्या क्लर्कचा निकाल आला. मात्र बँकेच्या अधिकारी पदाचा निकाल आईच्या मृत्यूनंतर आल्याने नीरजला अधिकारी बनलेला पाहण्याचे त्याच्या आईचे स्वप्न अधुरेच राहिले. मात्र मृत्यूआधी आईला दिलेला शब्द पूर्ण करण्याचे समाधान असल्याची कबुली नीरजने दिली.

वडिलांचे कठिण परिश्रम
नीरजचे वडील राजू धवंजेवार हे गेल्या 30 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. वणीतील ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. ते पूर्णवेळ पत्रकारिता करतात. पत्रकारिता पूर्णवेळ व्यवसाय नसल्याने त्यांची घरची परिस्थिती बेताचीच आहे. मात्र त्यांनी मुलांना शिकवण्यात कोणतीही कसूर ठेवली नाही. प्रसंगी त्यांनी अनेकांकडून वेळोवेळी मदत घेतली. मात्र मुलाच्या शिक्षणात कुठेही खंत पडू दिला नाही. त्यामुळे नीरजच्या यशात त्याच्या वडिलांच्या परिश्रमाचा वाटा मोठा आहे.

नीरजला रिझर्व बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याचे स्वप्न आहे. त्या परीक्षेची सध्या तो तयारी करतोय. भविष्यात ही परीक्षा देखील उत्तीर्ण होईल असा विश्वास त्याने ‘वणी बहुगुणी’जवळ व्यक्त केला. नीरजच्या यशाबद्दल परिसरात कौतुक होत आहे. ठिकठिकाणी नीरजचा सत्कार देखील केला जात आहे. तो आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, आयकॅन अकाडमीचे संचालक व शिक्षक यांच्यासह मित्रमंडळींना देतो. कठिण काळात मित्रमंडळींनी मानसिक व सर्वतोपरी आधार दिल्याने मित्रमंडळीचे तो विशेष आभार मानतो. (नीरज धवंजेवार – 88884 93757)

Comments are closed.