विवेक तोटेवार, वणी: चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथील शस्त्राच्या धाकावर तस्करी करणारा कुख्यात डॉन शेख हाजी शेख सरवर व त्याच्या तीन साथीदारास जेरेबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. यांच्यातील एक आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. वणीत ते सर्व आरोपी एका प्रॉपर्टी ब्रोकरचा खून करण्याच्या उद्देशाने आले असल्याचा अंदाज आहे.
सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी दीपक उर्फ बंटी किसन रघुवीर (37) हे प्रॉपर्टी ब्रोकरचे काम करतात. कामानिमित्त ते 28 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता आपल्या मित्रांसोबत लालगुडा चौफुलीवर आपल्या वाहनजवळ उभे होते. त्याच वेळी हाजी व त्याचे साथीदार स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम एच 34 बी एफ 0271 ने उतरले. यावेळी हाजीने माझ्या भावाच्या खुनात ज्याचा हात होता त्याच्यासोबत राहतो’ म्हणून हुज्जत घातली व हातातील बियारची बाटली फेकून मारली. बंटीने ती चुकवली बाटली ही बंटीच्या गाडीच्या काचेवर आदळली. त्यानंतर अचानक बंटीवर हल्ला केला व त्याला खाली पाडून त्याची मान दाबून धरली. त्यानंतर हाजीच्या साथीदारांनी बंटीला लथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर हाजीचा साथीदार मुस्तफा शेख याने बंटीच्या डोक्यावर देशी कट्टा टेकवला व गोळी झाडून मारण्याची धमकी दिली.
त्याच वेळी अचानक पेट्रोलिंग करीत असलेले पोलिसांचे वाहन घटनास्थळी पोहचले. त्यांनी शेख हाजी शेख सरवर (36) राहणार घुग्गुस, सोनू शेख मुस्तफा शेख (21) राहणार नाकोडा जिल्हा चंद्रपूर, रणजीत उर्फ काका साहेबसिंग गिल (23) राहणार गडचांदूर, आशिष चिंतामण फुलझेले (28) राहणार गडचांदूर तालुका कोरपना यांना अटक केली. यांच्यातील एक आरोपी शेख सलमान राहणार काजीपुरा चंद्रपूर हा पळून जाण्यात यशस्वी झाला.
पोलीस देवासारखे वेळेवर धावून आल्याने बंटीचा जीव वाचला. वरील चारही आरोपीवर कलम 307, 294, 427, 506, 147,148, 149 भादवी व सहकलम 2/25 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपींना कोर्टात हजर केले असता आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो उ नी अनुप वाकडे करीत आहे.