हिवरखेडला ‘‘नवोदय’’च्या विद्यार्थ्यांनी कवितांसह घेतले सूत्रसंचालनाचे धडे

सुनील इंदुवामन ठाकरे यांनी विद्यार्थांना दिल्या सूत्रसंचालनाच्या टिप्स

0

प्रल्हाल बुले, मोर्शी: तालुक्यातील हिवरखेड येथे नवोदय ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ, हिवरखेड द्वारा संचालित नवोदय उच्च माध्यमिक विद्यालय व नागोरावदादा सदाफळे नवोदय विद्यालय हिवरखेड येथे सूत्रसंचालन कार्यशाळा आणि जगू कविता: बघू कविता हा कार्यक्रम झाला. या अंतर्गत निवेदक, कवी, लेखक व मुक्तपत्रकार सुनील इंदुवामन ठाकरे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसह सूत्रसंचालनाचे धडे दिले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक घोडमारे होते. विचारपीठावर शिक्षकवृंद बुले, ठाकरे, श्रीवास, देशमुख, चिंचमलातपुरे, कऱ्हे, बोंडे, वानखडे, विघे, नागदेवे, चव्हाण, वर्धे, रायचुरा, पारीसे आणि कलावंत शुभम परतेती उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन आणि आभारप्रदर्शन कलाशिक्षक प्रल्हाद बुले यांनी केले.

‘‘सूत्रसंचालन कार्यशाळा’’ आणि ‘‘जगू कविता: बघू कविता’’ या कार्यक्रमांतून सुनील इंदुवामन ठाकरे यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. स्टेजवर बोलताना देहबोली, प्रमाणभाषा, उच्चार, आवाजातील चढउतार यावर त्यांनी विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करवून घेतले. स्टेजवर बोलताना भीती कशी टाळावी, पूर्वतयारी कशी करावी याच्या टिप्सदेखील ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना दिल्यात.

‘‘जगू कविता: बघू कविता’’ अंतर्गत त्यांनी कविता आणि सकारात्मक जगणं यावर चर्चा केली. अनेक कवितांमधून जगणं कसं पेरलं आहे त्याचा उहापोह केला. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सक्रीय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विषयाच्या संबंधाने विचारलेल्या प्रश्नांना ठाकरे यांनी समर्पक उत्तर दिले. सलग दोन तास चाललेल्या संवादात्मक कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.