विवेक तोटेवार, वणी: पेट्रोल, डिजेलच्या वाढत्या किमतीमुळे आज दिनांक 10 सप्टेंबरला विरोधी पक्षांकडून भारत बंदची हाक देण्यात आली होती. भारत बंदचा परिणाम वणीतही दिसून आला. यात वणीतील सर्व विरोधीपक्ष वाजत गाजत सहभागी झाले होते. तर व्यापारी प्रतिष्ठाने बंद करून व्यापा-यांनी त्याला पाठिंबा दिला. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
सरकारविरोधात काढण्यात येणा-या रॅलीसाठी सर्व पक्षाचे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी तयार होते. सकाळी 9 च्या सुमारास टिळक चौकातून रॅली काढण्यात आली. ही रॅली खाती चौक, गांधी चौक, गाडगेबाबा चौक, भगतसिंग चौक, सर्वोदय चौक, टागोर चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, शिवाजी चौक या मार्गाने जात याचा समारोप दुपारी एक वाजता तहसील कार्यालयात झाला. तहसिल कार्यालयात उपविभागीय अधिका-यांना सर्वपक्षीय निवेदन देण्यात आले.
या बंद दरम्यान कोणतही अनुचित किंवा तोडफोडीची घटना समोर आली नसून शांततेत हा बंद पाळण्यात आला. बंदसाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. वणी बहुगुणीशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा म्हणाले की सरकार पेट्रोल डिजेलचे दर कमी करण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरलेले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाचे दर कमी असतानाही सरकार पेट्रोल, डिजेलचे दर वाढवून सर्वसामान्यांचा खिसा कापत आहे. जर पेट्रोल डिजेलचे दर कमी झाले नाही तर येत्या काळात आणखी आंदोलन तिव्र करू असा इशाराही त्यांनी दिला.