बहुगुणी डेस्क, वणी: गेल्या काही दिवसांपासून शहरात बदलते वातावरण आणि अस्वच्छता याने डेंग्यू, मलेरिया या रोगाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत होती. त्यामुळे रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी नगरपालिकेतर्फे तातडीने उपाययोजना आखण्यात आली आहे. त्यासाठी फॉगिंग मशिन फिरवण्याचे आणि जर्म किलरची फवारणी करण्याचे आदेश नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी दिले. त्यानुसार आज मंगळवार पासून कामाला सुरुवात झाली आहे.
डेंग्यू आणि मलेरिया हे रोग मुख्यतः डासांपासून होतात. अस्वच्छ परिसर आणि साचलेले पाणी यात हे डास अंडी घालतात त्यामुळे डासांची संख्या वाढते. परिणामी या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होतो. परिसरात रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी आता नगरपालिकेने पावलं उचलली असून नगरराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी त्वरित फॉगिंग मशिन फिरवण्याचे, तसेच नालीसफाई करून फवारणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले आहे.
मुख्यधिकारी संदीप बोरकर यांनी त्वरित कार्यवाहीला सुरूवात केली असून वणी शहरात फॉगिंग मशिन फिरण्यास सुरुवात झाली आहे. रोज संध्याकाळी ही फॉगिंग मशिन वणी शहरात फिरणार आहे. तर सकाळी फिनाईल आणि जर्म किलर याची फवारणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. डास निर्मुलनासाठी दहा फॉगिंग मशिन वणीमध्ये कार्यरत आहे.
डासांची उत्पत्ती ही पाण्यात होत असल्याने नागरिकांनी पाणी झाकून ठेवावे. तसचे परिसरातील माठ, टायरट्यूब यात पाणी साठून असल्यास ते रिकामे करावे. पाण्याच्या टाक्या आठवड्यातून एकदा स्वच्छ करून उन्हात कोरड्या करून सुकवून घ्याव्यात. कोरडा कचरा ओला कचरा घंडागाडीत टाकावा. तसेच परिसर स्वच्छ ठेवण्यास नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी केले आहे.