आगळीवेगळी परंपरा असलेला बाबापूरचा गणपती

दहाही दिवस असतो महाप्रसाद... सर्व मुली येतात माहेरी परत

0

सुरेन्द्र इखारे, वणी: बाबापूर… वणीपासून 22 किलोमीटर अंतरावर असलेलं हे एक गाव. या गावाची विशेषता म्हणजे इथला आगळीवेगळी परंपरा असलेला गणेशोत्सव. इथे गणेशोत्सवादरम्याने रोज महाप्रसादाचा कार्यक्रम होतो. तसेच गणेशोत्सवा दरम्यान गावातील सर्व लग्न झालेल्या मुली सासरहून माहेरी परत येतात. या गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली जाते.

या अशा आगळ्यावेगळ्या परंपरेमागे एक आख्यायिका आहे. एके काळी या गावावर मृत्यूचं संकट आलं होतं. गावात लोक मरू लागले होते. यातून सुटका होण्यासाठी एका व्यक्तीने गणपतीचा नवस बोलला. तेव्हापासून गावावरचे मृत्यूचे संकट टळले. अशी इथल्या भाविकांची श्रद्धा आहे. तेव्हापासून गावात गणेशोत्सवाची परंपरा सुरू झाली. ही आख्यायिका अनेकांना माहिती असल्याने भाविक मोठ्या संख्येने दूरवरून इथे दर्शनाला येतात. विशेष म्हणजे गावातील विवाह झालेल्या मुली सासरवरून गणेश उत्सवाला माहेरी येतात त्यामुळे गावाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

गावात गणपतीच्या स्थापनेपासून तर विसर्जनापर्यंत रोज 10 दिवस भजन, कीर्तनाचा कार्यक्रम व नवस बोलणा-या प्रत्येक व्यक्ती कडून प्रत्येक दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवला जातो. गेल्या कित्येक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. इथे दररोज 1500 ते 2000 भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. संपूर्ण गावात गणेशोत्सवादरम्यान इलेक्ट्रिक सिरीज लावून रोषणाई केली जाते. सोबतच प्रत्येक चौकात सजावट केली जाते.

गणेशोत्सवाचं आणखी एक आकर्षण म्हणजे इथलं भजन मंडळ. इथे रोज वेगवेगळ्या गावातील भजनी मंडळ येते. यामध्ये चंद्रपूर, कोरपना, चामोर्शी, चिंचघट, कृष्णाणपूर, गोडगाव, नवरगाव, पिंपरी, महांकालपूर, सिंधीवाढोणा इत्यादी गावातील प्रसिद्ध भजनी मंडळाचा समावेश असतो. इथे येणा-या मंडळाला बाबापूर गणेश मंडळातर्फे रोख स्वरूपात पारितोषिक देऊन सन्मानित केले जाते.

दरवर्षी गणेशाच्या मूर्तीचा आकार वाढवण्याची एक प्रथा आहे. मात्र इथे पूर्वीपासून गणपतीचा जो आकार, उंची, बैठक आहे. तीच आजही कायम आहे. या गणेशोत्सवासाठी मंडळाचे अध्यक्ष संजय भोयर, उपाध्यक्ष दिवाकर डाहुले, सरपंच सुमन्ता गोवरदिपे, ज्येष्ठ नागरिक आत्माराम काकडे, शामराव कोरवते, गिरसावले यांच्यासह गावातील मुली निकिता मेश्राम, अचल तुराणकर, पूजा ताजणे, पूजा मेश्राम, साक्षी नांदे तसेच गावकरी परिश्रम घेत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.