सेल्फी घेण्याच्या नादात दोन तरुणांचा नदीत बुडून मृत्यू
मांगली येथे मोहरम उत्सवासाठी आलेेेेल्या भाविकांवर काळाचा घाला
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील राजूर (गोटा) येथे पैनगंगा नदीत बुडून दोघांचा मृत्यू झाला असून एकाची परिस्थिती गंभीर आहे. तर दोघे पोहून बाहेर आले. सेल्फी घेण्याच्या नादात डोंगा उलटल्याने ही घटना घडली. मांगली येथील मोहरम उत्सवासाठी हे तरुण तेलंगणाहून आले होते.
यवतमाळ जिल्ह्यात मांगली येथील मोहरम प्रसिद्ध आहे. या मोहरम करिता दूरदूरून लोक येतात. या सणात मुस्लिम समाजासह हिंदू समाजही मोठ्या प्रमाणात सहभागी होतो. यावर्षीही तेलंगणातून बरेच लोक मांगली इथे आले होते. १९ सप्टेंबरला रात्रभर मोहरमचा उत्सव साजरा करण्यात आला. मोहरम करीता हजारोच्या संख्येने भाविक गोळा झाले होते.
आज सकाळी 9 वाजताच्या दरम्यान आदीलाबाद येथील शेख आर्षद १४ वर्ष, शेख सफिर सिराज १६ वर्ष, सय्यद उमेद अजीम १८ वर्ष हे त्यांच्या दोन मित्रांसह राजूर गावाजवळील नदीच्या घाटावर गेले. तेथे असलेलया डोंगा (नदी पार करण्याकरिता असलेली नाव) घेऊन नदीच्या पाण्यात गेले. तिथे सेल्फी काढण्याच्या नादात डोंगा नदीतत पलटी झाला. डोंगा पाण्यात पलटी झाल्यावर पाच तरुणांपैकी दोन तरुण पाण्यातून पोहत बाहेर पडले.
डोंगा पलटल्याची माहिती राजूर(गोटा) येथील गावकर्यांना मिळताच अनिल खडसे, यादव राऊत, दुर्वास राऊत, निलेश खडसे, विकास टेकाम, सुनील भोयर, संदीप ठाकरे, प्रवीण खडसे हे घटनास्थळी पोहोचले व त्यांनी बुडणाऱ्या तरुणांना बाहेर काढले. तिघांना नदीच्या बाहेर काढून मुकुटबन येथील शासकीय रुग्णालयात आणले.
डॉक्टरांनी शेख आर्षद व शेख सुफिर सिराज या दोघांना मृत घोषित केले. तर बाहेर काढलेल्या सय्यद उमेद अजीम याची परिस्थिती गंभीर आहे. त्याला आदिलाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.